अहमदाबाद- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. त्यालाच सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं. एका राजकीय नेत्याने असं विधान करणं अयोग्य असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हंटलं आहे. भाजपा आणि संघ महिलाविरोधी असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘भाजपाने देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 4 महिला राज्यपाल, 6 केंद्रीय मंत्री दिल्या आहेत,’ असं स्वराज यांनी म्हटलं. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुषमा स्वराज बोलत होत्या.
भाजपा आणि संघात महिलांना समान वागणूक मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. ‘संघाच्या शाखेत एखाद्या महिलेला हाफ पॅन्टमध्ये पाहिलं आहे का?,’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता. याबद्दल सुषमा स्वराज यांना अहमदाबादमधील कार्यक्रमात एका तरुणीने त्यांची प्रतिक्रिया विचारली. ‘राहुल गांधींचं विधान मला पटलं नाही. त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरायला नको होती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न एका तरुणीने सुषमा स्वराज यांना विचारला होताना. ‘तुम्हाला जे वाटले, तेच मलाही वाटलं. एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींनी त्या पद्धतीची भाषा वापरायला नको होती. ते आता पक्षाचे अध्यक्ष होणार, अशीही चर्चा आहे. पण त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यांनी पातळी न सोडता टीका केली असती, तर मी त्यांना जरुर उत्तर दिलं असते',असं सुषमा स्वराज यांनी म्हंटलं आहे.
‘आमच्या सरकारआधी कधीही एखादी महिला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची सदस्य झाली नव्हती. भाजपा सरकारच्या काळात या कमिटीतील ५ पैकी दोन सदस्य या महिला आहेत,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी राहुल गांधींच्या यांच्या टीकेला उत्तर दिलं.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला. भाजपाचा मुख्य आधार आरएसएस आहे, या संघटनेत किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कधी बघितलंय का कुणी महिलांना या शाखांमध्ये अर्ध्या चड्डीत, मी तर नाही बघितलं कधी, अशी विचारणा त्यांनी केली.