मनोहर कुंभेजकर
नवी दिल्ली - सीआरझेड २०१८ अधिसूचनेचा मसुदा मच्छीमारविरोधी आहे. लोकशाही पद्धतीला अनुसरून तो प्रसिद्ध झालेला नाही. तरी ही अधिसूचना रद्द व्हावी म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली असून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्यासह नऊ सागरी खासदारांनी आम्हाला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र पर्यावरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची अधिसूचना रद्द करण्याची मानसिकता दिसत नाही. जर ही अधिसूचना रद्द नाही झाली तर येत्या ३ ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीत नॅशनल फिशवर्कर्स फोरम गुजरात ते कन्याकुमारी आणि पश्चिम बंगाल ते कन्याकुमारी अशी सागरी यात्रा नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.
एनएफएफच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली असता त्यांनी मच्छीमारांचे म्हणणे ऐकून घेत पाठिंबा दर्शविला. खासदारांनी संसदेत याप्रश्नी आवाज उठविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर एनएफएफच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचीही भेट घेतली. मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ही अधिसूचना रद्द करण्याची मानसिकताच दिसत नाही. वास्तविक ही अधिसूचना मच्छीमारांना विश्वासात न घेता मच्छीमारांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता प्रसारीत करण्यात आली असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. सीआरझेड अधिसूचना रद्द न केल्यास ३ ते १२ जानेवारी रोजी सागरी यात्रा काढली जाणार आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरात येथून पश्चिम व पूर्व टीमकडून सागरी यात्रेला सुरूवात होईल आणि दोन्ही टीम कन्याकुमारी येथे १३ जानेवारीला एकत्र येतील अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी लोकमतला दिली.
दरम्यान गेल्या २५ जुलै रोजी एनएफएफने नवी दिल्ली कॉन्सिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे किनारपट्टीवरील खासदारांसमवेत चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रास केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांच्यासह महाराष्ट्रातून खासदार विनायक राऊत, खासदार हुसेन दलवाई, खासदार राजेंद्र गावित, पश्चिम बंगालमधून खासदार महंमद सलीम आणि प्रदीप भट्टाचार्य, केरळचे खासदार तथा माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री के. व्ही. थॉमस, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर, दमण-दीव खासदार लालुभाई पटेल यांनी उपस्थिती दर्शवून एनएफएफच्या मागणीला पाठिंबा दिला. एनएफएफचे जनरल सेक्रेटरी टी. पीटर, ज्योती मेहेर, ओलिन्सिओ, वर्ल्ड फिशवर्कर्स फोरमचे प्रतिनिधी लिओ कोलासो, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पोर्णिमा मेहेर, राजेश मांगेला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.