हरीश गुप्तानवी दिल्ली : राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे आवश्यक आहे, जिथे सर्वांचे ऐकून घेतले जाईल, अशी पद्धत राजकीय पक्षांमध्ये असायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि गांधी परिवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. राजकीय पक्षांतील लोकशाही प्रक्रियेविषयी फारसे लिहिले जात नाही, अशी खंतही पंतप्रधानांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.काँग्रेसची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडून राहुल गांधी यांना देण्याची चर्चा सुरू असताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता, हे विधान केले. राजकीय पक्षांना मिळणाºया देणग्यांविषयी खूप काही लिहिले जाते, पण पक्षांतर्गत लोकशाहीचा उल्लेख केला जात नाही, असेही ते म्हणाले. भाजपाने पत्रकार व प्रसारमाध्यमांचे संपादक व प्रमुख यांच्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात व्यासपीठावर मोदी यांच्यासमवेत पक्षाध्यक्ष अमित शहा व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन हेच नेते होते.प्रसारमाध्यमांची प्रशंसामोदी यांच्या भाषणाचा बराच भाग प्रसारमाध्यमांचे कौतुक करणारा होता. स्वच्छ भारत मोहिमेला प्रसारमाध्यमांनी दिलेल्या पाठिंब्याची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, मी हल्ली सहजपणे भेटत नाही, अशी तुमच्यापैकी अनेकांची तक्रार असते. पूर्वी आनंदी वातावरण असायचे. आता तसे नसते. पण आता भेटणे अवघड होऊ न बसले आहे. पत्रकारांची संख्याही खूप वाढली आहे. त्यामुळे सर्वांना भेटणे, सर्वांशी संपर्क ठेवणे, हेच मोठे आव्हान झाले आहे. मुद्दाम भेटण्याचे टाळतो, असे नाही. पण भेटणे खरोखरच अवघड होत आहे.या कार्यक्रमात ते फार आनंदी वा उत्साही दिसत नव्हते. नेहमीप्रमाणे पत्रकारांमध्ये ते फार वेळ मिसळले नाहीत आणि त्यांच्याशी बोलतानाही खुलल्याचे दिसले नाही. कदाचित गुजरातच्या निवडणुकीचा तणाव हे त्याचे कारण असू शकते. अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. ताजमहाल वादाचा फायदा गुजरातमध्ये मिळेल, असे भाजपा नेत्यांना वाटत आहे.
राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे - मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 6:03 AM