कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मताम बॅनर्जी यांनी कालच दिलेल्या मुलाखतीमध्ये एक नवी धक्कादायक माहिती लोकांसमोर आणली आहे. ''मला मारण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी माझ्या हत्येची सुपारीही दिली आहे. त्यामुळे मी माझे मृत्यूपत्र करुन ठेवले आहे'', अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना सांगितली. इतकेच नव्हे तर, ''मी मृत्यूपत्रही करुन ठेवले असून जर आपली हत्या झाली तर माझा राजकीय पक्ष (तृणमूल काँग्रेस) कोणी चालवायचा हे त्यात लिहून ठेवले आहे. जरी आपली हत्या झाली तरी सर्व काही माझ्या मृत्यूपत्रातील नोंदीप्रमाणे होईल असे सांगत मला मारण्याची योजना करणारे दीर्घकालीन भविष्याचा विचार केल्यास यशस्वी होणार नाहीत'' असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
ममता यांनी अचानकच नवी माहिती लोकांसमोर आणल्यामुळे त्या नक्की कोणत्या पक्षांबद्दल बोलत आहेत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे पण याबाबत त्यांनी काहीच माहिती दिली नाही. मी या राजकीय पक्षांचे नाव सांगणार नाही पण मी कोणत्या पक्षांबद्दल बोलत आहे हे तुम्हाला समजले असेलच असे त्या म्हणाल्या आहेत. ''मला मारण्यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना आधीच पैसे देऊन झाले आहेत असा दावाही त्यांनी केला. यापुढे त्या बोलताना त्या म्हणाल्या, मारेकऱ्यांनी माझ्या घराची रेकीही केली आहे, मात्र मी घाबरत नाही जे राजकीय क्षेत्रात माझ्याशी लढू शकत नाहीत तेच अशा प्रकारचे कृत्य करत आहेत''. ममता यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत मोठा दावा केला असला तरी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती मात्र त्यांनी दिली नाही.
ममता यांनी यापुढे जात 2019 सालच्या निवडणुकांबाबतही भाष्य केले, ''प्रथम (ते राजकीय पक्ष) तुमची प्रतिमा मलिन करतात मग तुम्हाला संपविण्याचा ते प्रयत्न करतात आणि माझी हत्या केल्यानंतर ते खोटे खोटे अश्रू ढाळतील. तुमच्या (मुलाखत घेणाऱ्यांना उद्देशून) क्षेत्रातील काही लोकही यात सहभागी आहेत. त्यांना माझा आवाज दाबून टाकायचा आहे. 2019 साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्यामुळे प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका बजावायला मिळेल असे भाकितही त्यांनी केले. जर काँग्रेस आणि भाजपाला असे वाटत असेल की नेहमी तेच सत्तेत राहतील, तर तसे होणार नाही. प्रादेशिक पक्षही आहेत. फेडरल फ्रंट आता अधिकच शक्तीशाली झाली आहे. एखाद्या कुटुंबात एकमेकांचं ऐकतात तसं त्यात (फेडरल फ्रंटमध्ये) आहे. आम्ही नेहमीच या कुटुंबासाठी नेहमीच सामुहिक निर्णयांना पाठिंबा देऊ. पण या कुटुंबात माझी भूमिका काय असा प्रश्न विचारल्यावर मात्र मी त्याचं उत्तर देऊ शकणार नाही कारण मी अत्यंत लहान आहे. मी इतरांच्या मतांचा आदर करते."