हरिश गुप्ता,
नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला. काश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सगळ््या राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. गेल्या ४५ दिवसांपासून खोऱ्यात निर्माण झालेली अशांतता संपून सर्वसामान्य परिस्थिती निर्माण व्हावी, असे आवाहनही मोदी यांनी केले. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त विरोधी पक्षीय शिष्टमंडळाने मोदी यांच्याशी सोमवारी सकाळी सव्वा तास चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘‘२० जणांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने या चर्चेमध्ये केलेल्या विधायक सूचनांचे मोदी यांनी स्वागत केले व खोऱ्यातील लोकांच्या कल्याणाला सरकार बांधील असल्याचा पुनरुच्चार केला.’’ शिष्टमंडळात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जी. ए. मिर यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि माकपचे आमदार एम. वाय तरिगामी यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने मोदी यांच्या आधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचीही भेट घेतली. ओमर अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की मोदी यांनी केलेल्या निवेदनाचे आम्ही स्वागत करतो. खोऱ्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल. आतापर्यंत काश्मीरमधील हिंसाचारात ६७ जण ठार झाले आहेत. >सरकार पाठिशीखोऱ्यातील सध्याच्या अशांतेत ज्यांना जीव गमवावे लागले ते आमचे, आमच्या देशाचे होते. मग ते युवक असतील वा सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस. हे सगळेच दु:खदायक आहे. सरकार आणि देश जम्मू आणि काश्मीरच्या पाठिशी आहे. सगळ््या राजकीय पक्षांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना हा संदेश सांगावा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान