कोलकाता : जैवविघटन न होणाऱ्या वस्तूंचा निवडणूक प्रक्रियेत तसेच प्रचारकार्यात वापर करू नका. त्याऐवजी डिजिटल किंवा अन्य घटकांचा उपयोग करावा, असे आवाहन पर्यावरणवादी, निसर्गप्रेमींनी राजकीय पक्षांना केले आहे.
पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करावा. फ्लेक्स, प्लास्टिकचे ध्वज यांचा उपयोग टाळावा. निवडणुका होऊन गेल्यानंतर फलक व इतर गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो. त्यामुळे गटारे तुंबण्याचेही प्रकार घडतात. हे प्रकार टाळता येणे शक्य आहे.
एसएमएस, व्हॉट्सॲप, रील्सद्वारे करावा प्रचार’पर्यावरणतज्ज्ञ सोमेंद्र मोहन घोष यांनी सांगितले की, उमेदवार मतदारांना एसएमएस, व्हॉट्सॲप, रील्सद्वारे प्रचाराचे संदेश पाठवू शकतात. प्रचारासाठी लागणारे फलक कॉटन किंवा कागदापासून बनविता येतील.पर्यावरणस्नेही घटकांपासून बनविलेल्या गोष्टींचा प्रचारकार्यात वापर वाढवायला हवा. अनेक वाहनांच्या ताफ्यासह उमेदवाराची मिरवणूक काढली जाते. त्यामुळेही वायुप्रदूषण वाढते. अशा गोष्टींपासून राजकीय पक्षांनी दूर राहायला हवे.