लखनौ - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाने धार्मिक गोष्टींचा चलाखीने वापर चालविला आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या भूमिकेवर आधीपासून ठाम असलेल्या भाजपने रामनामाचा गजर पुन्हा मोठ्या आवाजात सुरू केला आहे, तसेच भगवान विष्णूच्या नावाने एका भव्य शहराची उभारणी करण्याचे समाजवादी पक्षाने ठरविले आहे.मानसरोवर यात्रा करून आलेल्या राहुल गांधींचे शिवभक्त म्हणून अमेठीत जे स्वागत झाले त्यावरून काँग्रेसने भगवान शंकराला जवळ केल्याचे दिसत आहे.या आठवड्यात अमेठीच्या दौऱ्यामध्ये कावडियांनी राहुल गांधी यांचे ‘बम बम भोले’च्या जयघोषात स्वागत केले होते. या मतदारसंघात लावलेल्या फलकांमध्ये राहुल यांचा शिवभक्त, असा खास उल्लेख काँग्रेस पक्षाने केला होता.भाजपचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितले की, अयोध्येत वादग्रस्त जागीच राममंदिर बांधावे, असे पक्षाचे मत आहे. मात्र, त्याची बांधणी एकमताने व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे.भाजप व रा.स्व. संघाशी संबंधित संघटना व संत-महंतांनीही निवडणुका जवळ येताच राम मंदिराचा सूर आळविण्यास सुरुवात केलीआहे.भगवान विष्णूच्या नावाने एका भव्य शहराची उभारणी करून कंबोडिया येथील अंगकोर वाट मंदिराच्या धर्तीवर या शहरामध्ये विशाल विष्णू मंदिर उभारण्याचा विचार समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बोलून दाखविला. (वृत्तसंस्था)८0 जागांवर सर्वांचेच लक्षउत्तर प्रदेशमधून लोकसभेवर ८० खासदार निवडून जातात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे ७१, अपना दलाचे २, समाजवादी पक्षाचे ५ व काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. पुढील लोकसभा निवडणुकांत आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी जनतेला भुलविण्याकरिता या पक्षांनी देवदेवतांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांकडून देवदेवता वेठीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:44 AM