झारखंडमध्ये राजकीय सत्तानाट्य! चंपई सोरेन भाजपात जाणार की वापरणार 'शिंदे पॅटर्न'?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:22 PM2024-08-19T12:22:27+5:302024-08-19T12:25:17+5:30
झारखंडमध्ये राजकीय सत्तानाट्य घडत असून याठिकाणी हेमंत सोरेन यांच्या पक्षातील चंपई सोरेन नाराज असल्याचं दिसून येत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन सध्या पक्षात नाराज आहेत. आता ते पक्षाबाहेर पडणं केवळ औपचारिकता आहे. रांची ते दिल्लीपर्यंत ३ दिवसीय राजकीय चर्चांमध्ये रविवारी चंपई यांनी एक निवेदन जारी केले. त्यात पक्षात झालेल्या अपमानाबाबत उल्लेख करत पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. कोल्हान टायगर नावानं प्रसिद्ध चंपई सोरेन यांच्याकडे आता ३ पर्याय शिल्लक आहेत. पहिला पर्याय राजकीय सन्यास, दुसरा स्वत:चा पक्ष स्थापन करणे अन् तिसरा पर्याय अन्य पक्षात प्रवेश करणे.
चंपई यांच्या उघड बंडखोरीमुळे ते भाजपात जाणार की अन्य पर्याय शोधणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर दोनचा पक्ष आहे. चंपई सोरेन जेएमएम पक्षातून बाहेर पडून थेट भाजपात जाऊ शकतात. मागील काही दिवसांपासून याची चर्चा सुरू आहे. चंपई यांचा दिल्ली दौरा त्यातूनच चर्चेत आला. मात्र चंपई सोरेन यांची भाजपातील एन्ट्री सोपी नाही. त्यामागे २ कारणे आहेत. भाजपात याआधीच ३ प्रमुख नेते आहेत जे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. अशावेळी चंपई सोरेन यांची भूमिका काय असेल, भाजपा त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करेल का असा मुद्दा आहे.
दुसरं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हेमंत सोरेन भाजपावर पक्ष फोडल्याचा आरोप करतात. चंपई भाजपात गेले तर या आरोपाला बळ मिळेल. त्याचा राजकीय फायदा हेमंत सोरेन यांना होईल. जर भाजपानं चंपई सोरेन यांना पक्षात घेतले तर झारखंड निवडणुकीनंतर त्यांना केंद्रात मोठं पद देऊ शकतात. हे पद राज्यपाल अथवा एखाद्या आयोगाचे चेअरमनही असू शकते. चंपई यांच्या निवेदनानंतर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत मिळून ते स्वत:चा पक्ष स्थापन करू शकतात. पक्षाच्या नावाबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सूत्रांनुसार, चंपई हे जर पक्ष स्थापन करून निवडणूक लढले तर निवडणुकीनंतर ते किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतात. त्यावेळी भाजपा महाराष्ट्राच्या शिंदे फॉर्म्युल्यासारखे त्यांना मुख्यमंत्रिपद देऊ शकते. चंपई ज्या कोल्हान क्षेत्रातून येतात तिथे त्यांचे वर्चस्व आहे. ज्याठिकाणी २०१९ च्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला १४ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या. चंपई सोरेन यांच्याबाबत तिसऱ्या पर्यायाचीही चर्चा आहे. भाजपासोबत चंपई यांचं जुळत नसलं तर ते एनडीएतील इतर मित्रपक्षासोबतही जाऊ शकतात. जेडीयू, हम आणि लोजपा हे झारखंडमध्ये राजकीय सक्रीय आहेत. जेडीयूने कोल्हान इथं १-२ जागांवर निवडणूकही लढवली. अलीकडेच झारखंडमधील मोठे नेते सरयू राय हे जेडीयूत सहभागी झालेत.
चंपई सोरेन यांचा राजकीय प्रवास
चंपई सोरेन यांच्या राजकीय करिअरची सुरुवात शिबू सोरेन यांच्यासोबत झाली. झारखंड आंदोलनात चंपई यांना कोल्हानची जबाबदारी मिळाली होती. १९९१ च्या पोटनिवडणुकीत चंपई पहिल्यांदा सरायकोला जागेवरून निवडून आले. त्यानंतर २००० वगळता ते सातत्याने निवडून येत आहेत. २००९ मध्ये शिबू सोरेन यांच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री बनले. २०१० मध्ये भाजपा जेएमएममध्ये युती झाली तेव्हा चंपई यांना अर्जुन मुंडा सरकारमध्ये मंत्री बनण्याची संधी मिळाली. २०२४ च्या जानेवारीत ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली तेव्हा वडील शिबू सोरेन यांच्या सांगण्यावरून त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची चंपई यांना देण्यात आली. मात्र हेमंत सोरेन जेलमधून बाहेर येताच चंपई यांना राजीनामा देण्यास भाग पडलं. तेव्हापासून ते नाराज आहेत.