लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/चेन्नई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) नेते आणि तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के. पोनमुडी आणि त्यांचा मुलगा आणि खासदार गौतम सिगमनी यांच्या विविध ठिकाणांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात छापेमारी केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
राजधानी चेन्नई व्यतिरिक्त, विल्लुपुरममध्येदेखील पिता-पुत्राच्या परिसराची झडती घेतली जात आहे. सत्ताधारी द्रमुकने या छाप्याला ‘राजकीय सूड’ असे म्हटले आहे. उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी (७२) हे विल्लुपुरम जिल्ह्यातील तिरुक्कॉयलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर त्यांचा मुलगा सिगामनी लोकसभेत कल्लाकुरिची मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. सत्ताधारी पक्षाने असा दावा केला की स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील डीएमके भाजपला घेरण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पक्षाला धमकावणे हाच ईडीच्या छाप्यांचा उद्देश आहे.
केंद्राचा सर्व पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नतामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के. पोनमुडी आणि त्यांचा मुलगा आणि खासदार गौतम सिगमनी यांच्या परिसरात ईडीने झडती घेतल्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निषेध केला. केंद्रावर पक्ष फोडण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.