नवी दिल्ली / जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कोंडी फुटण्याचे आणि दोन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर पीडीपी-भाजपच्या युतीचे पुनरुज्जीवन करीत नव्याने सरकार स्थापण्याचे संकेत मंगळवारी पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून मिळाले आहेत.मोदी यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी १५ मिनिटे चर्चा केल्यानंतर मेहबुबा यांनी ही बैठक अतिशय सकारात्मक आणि चांगली राहिल्याचे संकेत देत जनतेशी संबंधित मुद्दे सोडविले जाणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात या दोन पक्षांमध्ये नव्याने विश्वासनिर्मितीच्या उपाययोजनांवर सहमती झाली आहे.तीन दिवसांपूर्वी पीडीपी-भाजपने सरकार स्थापण्यातील अडथळे दूर केल्यानंतर भाजपचे मुख्य मध्यस्थ राम माधव यांनी पीडीपीच्या नव्या मागण्या स्वीकारल्या जाणार नसल्याची घोषणा केली होती. मंगळवारी सकाळी मेहबुबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत सरकार स्थापण्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आम्ही सरकार स्थापण्यातील कोंडी सोडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत; मात्र पंतप्रधानांच्या भेटीनंतर आज मी समाधानी आहे, असे त्यांनी पत्रकारांना दिल्ली येथे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काश्मिरातील राजकीय कोंडी फुटण्याचे संकेत
By admin | Published: March 23, 2016 3:32 AM