Rajasthan Congress: राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी घडामोड! तीन मंत्र्यांचं सोनियांना पत्र, राजीनामा देण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 10:05 PM2021-11-19T22:05:07+5:302021-11-19T22:09:17+5:30
राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
जयपूर
राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदावरुन पायऊतार होऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून येत आहे.
राजस्थान सरकारमधील रघू शर्मा, हरीश चौधरी आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिली आहे. यासाठी तिन्ही मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.
दिवाळीआधीच राजस्थान सरकारमधील मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले होते. पण आता पूर्णपणे बदल करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे आणि याच दृष्टीकोनातून हे पहिलं पाऊल टाकलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलच्या चर्चेनं जोर धरला असतानाच आज अजय माकन जयपूरमध्ये पोहोचले असून काँग्रेस नेतृत्त्व राजस्थानमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गटातील तणावाच्या बातम्या याआधीही समोर येत राहिल्या आहेत. राजस्थान काँग्रेसमधील संतुलन आणि संघटना मजबूत राखण्यासाठी काही संघटनात्मक बदल देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे.