Prashant Kishor : काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देणार का?, प्रशांत किशोर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:54 AM2022-03-16T10:54:20+5:302022-03-16T11:02:30+5:30
Prashant Kishor on congress revival : काँग्रेसने एकजूट होऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, पण काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Poll 2024) भाजपला (BJP) जोरदार टक्कर देईल, असा विश्वास निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने एकजूट होऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पार्टीमध्ये संरचनात्मक कमकुवतपणा आणि बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला संधी आहे. काँग्रेस एकजूट राहिल्यास भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर म्हणाले.
'भाजप आता ताकदवान बनला आहे, पण तरीही पूर्व आणि दक्षिण भारतात संघर्ष करत आहे, कारण या प्रदेशांतील सुमारे 200 जागांपैकी 50 जागाही मिळवू शकलेल्या नाहीत. यामध्ये बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे', असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. यासाठी काँग्रेसला पुन्हा जमिनीवर यावे लागेल आणि काँग्रेसला पुनर्जन्म घ्यावा लागेल. आत्मा, विचार आणि विचारधारा यांना स्थान आहे आणि राहतील पण बाकी सर्व काही नवीन पाहिजेत. तसेच, कोणत्याही पक्षाला, विशेषत: काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पर्याय बनवायचा असेल तर, 10-15 वर्षांची मजबूत दृष्टी असायला हवी. यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.
'गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस मजबूत नाही'
सर्व विरोधकांना एकत्र करू शकतील, असे कोण नेते आहेत? असा सवाल प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. यावर प्रशांत किशोर यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, 'सर्वांना सोबत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली, तर त्याभोवती चेहरा बांधता येईल,' असे सांगितले. तसेच, जर तुम्ही योग्य दिशेला नॅरेटिव्ह घेऊन जाता आणि आघाडीचे लोक तुमच्याकडे असतील तर विचारधारा काहीही असो, पण भाजपचा पराभव करायचा असेल तर चेहरा आपोआप तयार होईल, असेही ते म्हणाले. तसेच, गांधी घराण्याला काँग्रेसमधून काढून टाकले तर काँग्रेस मजबूत होऊ शकणार नाही. त्यामुळेच काँग्रेसने जमिनीवर येऊन मूलभूत तत्त्वे मांडण्याची वेळ आली आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.