फेसबुक डेटावरून राजकीय खडाजंगी! काँग्रेस-भाजपा भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 06:11 AM2018-03-22T06:11:46+5:302018-03-22T06:11:46+5:30
अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये ५ कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या एका कंपनीवरून आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. डेटा चोरीचा आरोप असणा-या कंपनीची सेवा काँग्रेस घेणार असल्याची टीका करून भाजपाने नव्या वादंगाला तोंड फोडले आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये ५ कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या एका कंपनीवरून आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. डेटा चोरीचा आरोप असणा-या कंपनीची सेवा काँग्रेस घेणार असल्याची टीका करून भाजपाने नव्या वादंगाला तोंड फोडले आहे. काँग्रेसने त्याचा स्पष्ट इन्कार करताना भाजपानेच २0१४ साली या कंपनीची मदत घेतल्याचा आरोप केला.
केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीची सेवा घेतल्याप्रकरणी माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. हा प्रकार गंभीर आहे. या कंपनीशी काँग्रेसचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमेरिका, ब्रिटन, केनिया, ब्राझीलमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा या कंपनीवर आरोप आहे. कंपनीने अनेक देशांत गुप्तहेर, आकर्षक महिलांच्या माध्यमातून जाळे टाकून तसेच खोट्या बातम्या पेरून निवडणुकांवर प्रभाव टाकला. आम्ही प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचे समर्थन करतो. तथापि, दुरुपयोग करून अनिष्ट पद्धतीने निवडणुका प्रभावित करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा रवी शंकर प्रसाद यांनी दिला आहे.
भारतात असला प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही रवी शंकर प्रसाद यांनी दिला.
इशारा फेसबुकलाच
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना स्पष्ट इशारा देत रवी शंकर प्रसाद म्हणाले की, भारतात फेसबुकचे
२० कोटी सदस्य आहेत. त्यांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कारवाईसाठी त्यांना भारतातही बोलावले जाऊ शकते. डेटा चोरीचाच नव्हे, तर लोकशाही मूल्ये व निष्पक्ष निवडणुकीचा प्रश्न आहे.
या प्रकाराने फेसबुक आणि दस्तूरखुद्द मार्क झुकेरबर्ग यांची प्रतिष्ठा डागाळली असली तरी या प्रकरणी दोघे मौन बाळगून आहेत.
शेअर घसरला
अमेरिकेत फेसबुकवर डेटाचोरीचा आरोप झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली. सोमवारी कंपनीचे बाजार भांडवल जवळपास साडेतीनशे अब्ज रुपयांनी घसरले होते.
भाजपाने काय केले आरोप
- बातम्यांचा हवाला देत रवी शंकर यांनी दावा केला की, काँग्रेस केम्ब्रिज अॅनालिटिकाची सेवा घेत आहे. याबद्दल त्यांनी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्तीच केली.
- निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस असला अनुचित मार्ग पत्करणार का?
राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर चाहत्यांची संख्या अचानक वाढल्याचा उल्लेखही त्यांनी केला. लोकप्रियता मिळविण्यासाठी असल्या मार्गाचा वापर करणार का?
- काँग्रेसने आजवर अशा अनुचित मार्गाने किती भारतीयांची माहिती मिळविली?
याचा खुलासा करावा. गुजरात आणि ईशान्य भारतातील अलीकडच्या निवडणुकीनंतर कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही काँग्रेस या कंपनीची सेवा घेणार का? हेही स्पष्ट करावे.
भाजपानेच घेतली मदत
भाजपाच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसनेही भाजपावर पलटवार केला. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणाले, केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी आमचे काहीही देणेघेणे नाही. किंबहुना भाजपा आणि जेडीयूचाच या कंपनीशी संबंध आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपाने ‘मिशन -२७२’ तसेच हरियाणा, झारखंड, महाराष्टÑ आणि दिल्लीत कंपनीची सेवा घेतली.