जयपूर : राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या कथित कारस्थानाच्या संदर्भात राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाने दोघांना अटक केल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी या कारस्थानामागे भाजप असल्याचा आरोप केला. तर भाजपानेही हात वर केले.पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवून उदयपूरमधून अशोक सिंग व बीवर येथून भारत मालानी या दोघांना ताब्यात घेतले. आमदारांना प्रलोभने देऊन राज्य सरकार अस्थिर करण्याच्या आरोपांबाबत राजस्थान पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसओजी) मुख्यमंत्री गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट व महेश जोशी यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविले आहे. या प्रकरणी १२ आमदार आणि अन्य लोकांनाही लवकरच नोटीस जारी करण्यात येऊ शकते.काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांचा भाजपने मात्र साफ इन्कार करून हात झटकले आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचा धिक्कार करीत प्रदेश भाजपाचे अघ्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ््यांनीच हे सरकार पडेल. कोरोना साथीसह सर्व आघाड्यांवर अपयश आल्याने लोकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस असे आरोप आमच्यावर करत आहे.गेल्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक होण्याआधी विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी कर्नाटक व मध्य प्रदेशच्या धर्तीवर राजस्थानातही सत्ताधारी व अपक्ष आमदार प्रचंड पैशाच्या जोरावर विकत घेऊन लोकनियुक्त सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याचे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागास लिहिले होते. आताची कारवाई या पत्राच्या अनुषंगाने केली गेल्याचे समजते. काँग्रेस व अपक्ष आमदार फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी २५ ते ३० कोटींचे ‘गाजर’दाखविल्याचा आरोप या ‘एफआयआर’मध्ये आहे. (वृत्तसंस्था)सरकार स्थिर, पाच वर्षे टिकणार : गेहलोतपोलिसांनी केलेल्या या कारवाईची माहिती उघड होताच सरकार पाडण्याचे हे कारस्थान भाजपा करत असल्याचा आरोप करणारे पत्रक काँग्रेसच्या २० आमदारांनी जारी केले. त्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन हाच आरोप उघडपणे केला.ते म्हणाले की, कोरोनाची महामारी सुरु असताना सरकार पाडण्याचे हे उद्योग करणे हे भाजपाला माणुसकीची जराही चाड नसल्याचेच द्योतक आहे. परंतु आमचे सरकार भक्कम आहे, ते यापुढेही भक्कम राहील व पूर्ण पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड व प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश पूनिया त्यांच्या दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावरून हे उद्योग करत आहेत, असा थेट आरोप गेहलोत यांनी केला.फोन टॅप करूननोंदविला गुन्हाशस्त्रे स्मगलिंग करणाऱ्यांच्या रॅकेटची माहिती काढण्यासाठी काही जणांचे फोन ‘टॅप’ करण्याची परवानगी पोलिसांनी घेतली होती.त्यानुसार अशोक सिंग व भारत मालानी यांचे मोबाईलवरील संभाषण ‘टॅप’ करून गुन्हा नोंदविला. ‘एफआयआर’मध्ये कलम १२४ ए (देशद्रोह) व कलम १२० बी (गुन्हेगारी स्वरूपाचा कट) ही कलमे लावली आहेत. मात्र ‘लाच’ देऊन आमदार फोडण्याचा आरोप असूनही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची कलमे लावण्यात आलेली नाहीत.
राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्यावरून राजकीय खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:43 AM