नवी दिल्ली/कोझिकोडे : नवी दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये बीफ करी (गोमांस) वाढण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेथे प्रवेश केल्यामुळे राजकीय खडाजंगीला सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचा ‘छापा’ असा उल्लेख करून केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पोलीस कारवाईचा निषेध करून मोदी सरकारवर टीका केली. केरळ हाऊसवरील पोलीस कारवाई हा ‘संघराज्य रचनेवरील हल्ला’ आहे. जे भाजपाला आवडत नाही ते केरळचे मुख्यमंत्री खात आहेत, या संशयावरून दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांना केरळ हाऊसमध्ये घुसून अटक करणार काय? दिल्ली पोलीस भाजप-शिवसेनेसारखे वागत आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.केरळ हाऊसच्या उपाहारगृहातील पोलीस कारवाईचे भाजपने मात्र समर्थन केले. केवळ तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आणि पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच ही कारवाई केली, असे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, केरळ सरकार, केरळ हाऊसनेही गोमांस वाढण्यात आल्याचा आरोप फेटाळून लावला. आपल्या उपाहारगृहात गोमांस नव्हे, तर केवळ म्हशीचे मांस देऊ करण्यात आल्याचे आणि तेही केवळ मेन्यूवर असल्याचे केरळ हाऊसने स्पष्ट केले.कॅन्टिनच्या मेन्यूमधून म्हशीचे मांस हा पदार्थ हटविण्यात आला आहे, असे केरळ हाऊसने म्हटले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
‘बीफ करी’वरून राजकीय खडाजंगी
By admin | Published: October 27, 2015 11:25 PM