आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या काळातही नेते मंडळी बॅक टू बेसिक्स अर्थात जनसंपर्काच्या फॉर्म्युल्याकडे वळताना दिसत आहेत. गेल्या महिन्यातच राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशा ३,५७० किमीच्या 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात केली. यातच, रविवारी आणखी दोन यात्रांना सुरुवात झाली आहे. यात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलच्या (BJD) जनसंपर्क पदयात्रेचा आणि पश्चिम चंपारणमधील गांधी आश्रमातून बिहार निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या 3,500 किमीच्या पदयात्रेचाही समावेश आहे.
पटनायक यांनी भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिराजवळून गांधी जयंतीच्या मुहूर्तावर जन संपर्क कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी बीजेडी नेते आणि कार्यकर्त्यांनी ओडिशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी आपल्या या यात्रेदरम्यान बिहारमधील प्रत्येक पंचायत आणि ब्लॉकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, ही यात्रा पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिने लागू शकतात, असे म्हटले आहे.
किशोर यांनी भितिहरवा गांधी आश्रमापासून पदयात्रेला सुरुवात केली. गांधीजींनी 1917 मध्ये येथूनच पहिले सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते. या पदयात्रेला सुरुवात होताच रास्त्यावर लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कर्नाटकात -काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा आज 26वा दिवस आहे. ही यात्रा तामिळनाडू आणि केरळमधून आता कर्नाटकात पोहोचली आहे. यावेळी हा भारतीय राजकारणासाठी परिवर्तन आणि पक्षाच्या कायाकल्पासाठी 'निर्णायक संधी' आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
या नेत्यांनीही काढली होती भारत यात्रा - यापूर्वी वर्ष 1983 मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनहीही भारत यात्रेंतर्गत कन्याकुमारीपासून पदयात्रा सुरू केली होती. ही यात्रा 6 जानेवारी, 1983 ला सुरू झाली होती आणि सहा महिन्यानंतर दिल्लीत पोहोचली होती. यानंतर तत्कालीन पंतप्रधान तथा काँग्रेसाध्यक्ष राजीव गांधी यांनीही 1985 मध्ये मुंबईमध्ये एआयसीसीच्या पूर्ण सत्रात संदेश यात्रेची घोषणा केली होती. अखिल भारतीय काँग्रेसच्या सेवा दलाने ही यात्रा संपूर्ण देशात चालवली होती. यानंतर भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही रथ यात्रा काढली होती.
भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली 1990मध्ये राम मंदिर आंदोलनाला गती देण्यासाठी ही यात्रा कढण्यात आली होती. सप्टेंबर 1990 मध्ये सुरू झालेली ही यात्रा 10,000 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर 30 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील अयोध्येत संपणार होती. मात्र, ती उत्तर बिहारमधील समस्तीपुरमध्ये अडवण्यात आली होती.