हैदराबाद विद्यापीठ : राहुल विद्यार्थ्यांच्या पाठीशी, राजीनाम्यासाठी निदर्शनेहैदराबाद / दिल्ली : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि त्यासंदर्भात केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर गुन्हा नोंदविला जाण्यावरून मंगळवारी राजकारण आणखी तापले व हैदराबादसह दिल्ली, मुंबई व पुण्यातही याचे संतप्त पडसाद उमटले. केंंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पा राव यांच्यासह रोहितला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोहितच्या आईची भेट घेऊन तिचे सांत्वन केल्यानंतर निदर्शक विद्यार्थ्यांपुढे भाषण करून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. दिल्ल्लीत काँग्रेस, आम अदमी पार्टी व तृणमूल काँग्रेस आदी पक्षांनी दत्तात्रेय व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपाने या दुर्दैवी घटनेचे काँगे्रससह इतर विरोधीपक्ष राजकारण करीत असल्याचा अरोप भाजपाने केला तर विद्यापीठातील रोहितसह पाच विद्यार्थ्यांचे निलंबन आपल्या दबावामुळे झाल्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ठामपणे इन्कार केला..विद्यापीठातून निलंबित केलेल्या चार विद्यार्थ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे, रोहितच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशा अन्य मागण्याही निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली. त्यातच विद्यार्थ्यांच्या एका समूहाने विद्यापीठ परिसरात रोहितचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला. तथापि पोलिसांनी तो उधळून लावला. टीआरएस खासदार के. कविता यांच्या अध्यक्षतेखालील सांस्कृतिक संघटना तेलंगण जागृती युथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी रामनगरातील दत्तात्रेय यांच्या निवासस्थानाबाहेर नारेबाजी केली. हातात निषेधार्थ पोस्टर्स घेतलेल्या या निदर्शकांनी दत्तात्रेय यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. यावेळी दत्तात्रेय यांच्या घराजवळ धरणे देणाऱ्या ३७ निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर राहुल गांधींनी टिष्ट्वट करीत केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रेय व कुलगुरूंविरुद्ध मोर्चा उघडला. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू आणि दिल्लीत बसलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी निष्पक्ष कर्तव्य पार पाडले नाही. रोहितची आत्महत्या त्याचाच परिपाक आहे. रोहित इतका हतबल झाला की, त्याच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली. निश्चितपणे रोहितने आत्महत्या केली. पण कुलगुरू, मंत्री आणि व्यवस्थेने त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असे टिष्ट्वट त्यांनी केले.तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने हैदराबाद विद्यापीठाचा दौरा करीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.सात महिने शिष्यवृत्ती नाहीहैदराबाद विद्यापीठ परिसरातील एका खोलीत गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या रोहितला गत सात महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळाली नव्हती, अशी माहिती आत्महत्येपूर्वी रोहितने लिहिलेल्या पत्रातून समोर आली आहे. कार्ल सागानसारखा विज्ञान लेखक बनण्याची रोहितची इच्छा होती. माझी सात महिन्यांची शिष्यवृत्ती मिळायची आहे. माझ्या मृत्यूनंतर ती माझ्या कुटुंबाला मिळावी, कृपया यासाठी प्रयत्न करावे. मला रामजीचे सुमारे ४० हजार रुपये द्यायचे आहेत. माझ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतून या पैशाचीही परतफेड व्हावी, असे रोहितने पत्रात लिहिले आहे. काही लोकांनी खरोखरच माझ्यावर प्रेम केले. माया केली. मला कुणाबद्दलही तक्रार नाही. मला नेहमीच स्वत:बद्दल तक्रार राहिली आहे. माझा आत्मा आणि माझे शरीर यांच्यातील अंतर मला जाणवू लागले आहे. मला एक लेखक बनायचे होते. कार्ल सागानसारखे. पण मी केवळ हे पत्रच लिहू शकलो. हे माझे पहिले आणि अखेरचे पत्र आहे, असेही त्याने लिहिले आहे.गुंटूरचा रहिवासी असलेला रोहित हा विज्ञान-तंत्रज्ञान आणि समाज या विषयात पीएच.डी. करीत होता. आॅगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य चार दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप होता. या घटनेनंतर रोहित तणावाखाली होता. रविवारी त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.मोदींनी माफी मागावीरोहितच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण तापले असून मंगळवारी काँगे्रस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आदी पक्षांनी याप्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय व केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस प्रवक्त्या कुमारी शैलजा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दत्तात्रेय व इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. जे दिसते आहे, त्यापेक्षा हे प्रकरण कितीतरी मोठे आहे. पंतप्रधानांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देऊन दोषी मंत्र्यांविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी, असे त्या म्हणाल्या.दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदींनी याप्रकरणी दोषी असलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करीत देशाची माफी मागायला हवी. दलितांचे उत्थान हे मोदी सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे. असे असताना मोदींच्या मंत्र्यांनी पाच दलित विद्यार्थ्यांना बहिष्कृत व निलंबित केले, असे टिष्ट्वट केजरीवालांनी केले. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही टिष्ट्वट करीत विद्यार्थी संघटनांना सांप्रदायिक शक्तींविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले. कुलगुरूंची निवड रा.स्व.संघाद्वारे होत आहे. शिक्षणाऐवजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चालना देण्यात त्यांना रस आहे. सर्व विद्यार्थी संघटनांनी हे प्रयत्न हाणून पाडायला हवेत, असे टिष्ट्वट त्यांनी केले