नवी दिल्ली : परस्परविरोधी विचारप्रणालींच्या लढाईत बळीचा बकरा बनवून कोणतेही औपचारिक आरोप न ठेवता गेली नऊ वर्षे आपल्याला तुरुंगात सडविले गेले, असा युक्तिवाद २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी लेफ्ट. कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला.कर्नल पुरोहित यांनी अंतरिम जामिनासाठी केलेल्या याचिकेवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐेकल्यावर न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.पुरोहित यांची बाजू मांडताना सिब्बल म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोटांचा आरोप असलेल्या अभिनव भारत या संघटनेच्या बैठकांना पुरोहित हजर होते. पण त्यांची हजेरी कारस्थानात सहभागी होण्यासाठी नव्हे तर लष्कराच्या वतीने गुप्तवार्ता गोळा करण्यासाठी होती. तेथील माहिती पुरोहित यांनी वरिष्ठ अधिकाºयांना रीतसर कळविली होती. उच्च न्यायालयापुढे ही सर्व तथ्ये त्यांनी मांडली. पण अभियोग पक्षाने तुमच्याविरुद्ध या गोष्टींचा पुरावे म्हणून उपयोग केलेला नाही तेव्हा आम्ही त्यात लक्ष घालणार नाही, असे ते न्यायालयात म्हणाले.सिब्बल म्हणाले की, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने रचलेल्या कारस्थानानुसार कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स स्फोटके पुरविली, असा आरोप आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांना जामीन मिळाला आहे व एनआयएने त्यांना ‘क्लीन चिट’ दिलेली असताना पुरोहित यांना अंतरिम जामीन द्यायला काही हरकत असण्याचे कारण नाही.
राजकारणामुळे मला तुरुंगात सडविले - कर्नल पुरोहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:31 AM