ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील दादरी भागातील बिसहडा गावात शनिवारी तणावपूर्ण शांतता होती. पण या मुद्यावरून राजकारण पेटले असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी हिंदू सुद्धा गोमांस खातात असे विधान करून त्यात आणखी तेल ओतले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या परिसराचा दौरा करुन मृत इखलाकच्या कुटुंबियाची भेट घेतली. या हत्याप्रकरणातील दोन मुख्य आरोपी शिवम आणि विशाल या १८ वर्षीय तरुणांना अटक करण्यात आली आहे. बिसहडाजवळच एका ठिकाणाहून त्यांना अटक करण्यात आली. आतापर्यत या प्रकरणी ८ जणांना अटक झाली आहे.शिवाय दादरी हत्याकांडात सामील आणि अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी दिले. गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर संतप्त जमावाने या गावातील एका मुस्लीम कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात इखलाक ठार झाला होता. त्यानंतर विविध राजकीय पक्षांनी या हत्येचे राजकारण सुरू केले असून नेत्यांमध्ये पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी स्पर्धा लागली आहे.आप नेते केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते या शोकमग्न कुटुंबाच्या भेटीसाठी गेले तेव्हा सुरुवातीला त्यांना गावाबाहेरच रोखण्यात आले होते परंतु नंतर भेटीची परवानगी देण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यापासून गावात बाहेरून येणाऱ्या लोकांची गर्दी प्रचंड वाढली होती. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींवर दगडफेक केली. त्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले. गावकऱ्यांचा विरोध लक्षात घेता या लोकांना प्रवेशापासून रोखण्यात आले असून प्रशासनातर्फे परिसरातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे काही नेतेही होते. गावाबाहेर रोखण्यात आल्यामुळे केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. मृत इखलाकच्या कुटुंबियांना भेटल्यावर एक राजकीय पक्ष हिंदू व्होटबँकेसाठी दोन समुदायात विष पेरण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना काल प्रशासनाने शोकाकुल कुटुंबास भेटण्यापासून का रोखले नाही असा सवाल त्यांनी केला. भेटीसाठी येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे त्रास होत असून कुणालाही भेटण्याची आमच्या कुटुंबाची इच्छा नाही, अशी लिखित विनंती मृत इकलाखचा मुलगा सरताज याने केली असल्याचे जिल्हाधिकारी एन.पी.सिंग यांनी शुक्रवारी सांगितले होते. राहुल गांधी यांनी मात्र ग्रेटर नोएडाच्या बिसहडा गावाचा दौरा करून इखलाकच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल यांनी स्वत: टष्ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी आपले मौन तोडून दादरी घटनेचा निषेध करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (वृत्तसंस्था)कुटुंबीयांना वायुसेना परिसरात नेणारवायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अनुप राहा यांनी गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर एका वायुसेना कर्मचाऱ्याच्या वडिलांची हत्या होणे ही एक दुर्दैवी घटना असल्याचे सांगून पीडित कुटुंबाला वायुसेना परिसरात आणण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. मृत इखलाकचा मुलगा सरताज हा वायुसेनेत कार्यरत असून, सध्या तो चेन्नईत तैनात आहे. वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी सरताज आणि त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. वायुसेनादिनामित्त आयोजित पत्रपरिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना राहा यांनी सांगितले की, वायुसेना सरताजच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. त्यांना सुरक्षेची गरज असून आम्ही ती देत आहोत.शांतता कायम राखण्याचे राज्यपालांचे आवाहनउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आणि सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.लालूप्रसाद यांचे आगीत तेलराष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी हिंदूसुद्धा गोमांस खातात, असे वक्तव्य करून आगीत तेल ओतले आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याच्या प्रत्युत्तरात लालूप्रसाद बिथरले आहेत, अशी टीका भाजपाने केली. लालूप्रसाद यादव यांनी नंतर आपण ‘बीफ’गोमांस या अर्थाने म्हटले नव्हते आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी गोमांस आणि बकरीच्या मांसात काही फरक नसतो, असे स्पष्ट केले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला रवाना होण्यापूर्वी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना राजद प्रमुख म्हणाले, मांसाहार करणारे सभ्य नाहीत. गेल्या अनेक दशकांपासून या देशातील लोकांमध्ये परस्परांबद्दल असलेला विश्वास आणि सद्भाव तिरस्काराच्या राजकारणामुळे संपुष्टात येत असून याचे मला अत्यांतिक दु:ख आहे. या परिस्थितीत आम्हाला एकजूट होऊन विष पसरविणाऱ्यांविरुद्ध लढा द्यावा लागेल.- राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्षदादरी कांड म्हणजे केंद्र सरकारद्वारे कट्टरवादी शक्तींना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहनाचा परिणाम आहे. या शक्ती समाजात ध्रुवीकरणाद्वारे गोहत्येचा खोटा प्रचार करीत असून मुस्लिमांना लक्ष्य बनविण्याचा त्यांचा हेतू आहे.- प्रकाश करात, माकप नेते
गोमांस हत्येवरून राजकारण तापले
By admin | Published: October 04, 2015 3:32 AM