राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 01:20 AM2020-11-04T01:20:27+5:302020-11-04T06:29:50+5:30

Bihar Assembly Election 2020 : लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला.

Politics heats up: round of allegations; Modi says 'to fulfill aspirations for next decade' | राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

googlenewsNext

-  एस. पी. सिन्हा 

फोर्बेस्गंज : मागील दशक हे बिहारमधील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होते. मात्र, २०२१ - २०३० हे दशक राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. 
येथे एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, जंगल राज चालविणाऱ्यांनी एकेकाळी मतदान केंद्रांवर कब्जा करुन गरिबांचा मताधिकार हिसकावून घेतला. पण, रालोआने त्यांना मतदानाचा अधिकार परत दिला.  बिहारमधील नागरिक आता त्या लोकांना ओळखून चुकले आहेत ज्यांच एकमेव स्वप्न होते की, लोकांना घाबरवून, अफवा पसरवून, फूट पाडून सत्ता हस्तगत करणे. पण, बिहारचे लोक जाणतात की, कोण बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राजदचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, लोकांनी जंगलराजच्या डबल डबल युवराजांना नाकारले आहे. गत दशकात प्रत्येक घरात वीज पोहचली. आता आगामी दशकात बिहार चमकून उठेल. गत दशकात घरोघरी गॅस कनेक्शन पोहचले.

मोदी, नितीशकुमार यांनी बिहारला लुटले : राहुल गांधी 
कटिहार : कोरोना, बेरोजगारीची समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र व बिहार सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कटिहारमधील सभेत अशी टीका केली की, मोदी आणि नितीशकुमार यांनी बिहारला लुटले आहे. राज्याची जनता त्यांना उत्तर देईल.  जेव्हा लाखों मजूर हजारो किमी पायी चालून घरी येत होते तेव्हा नितीशकुमार आणि मोदी कोठे होते. आता मत मागायला येत आहेत. आम्ही सत्तेत नाहीत त्यामुळे लाखों मजुरांची मदत करु शकलो नाहीत. पण, क्षमतेनुसार लोकांची मदत केली.

नितीशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदा फेकला 
मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच गर्दीतून कोणीतरी त्यांच्या दिशेने कांदा फेकला. यावर नितिशकुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत रहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हणाले. यानंतर नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरविली आणि नितिशकुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.  सुरक्षारक्षकांनी जेव्हा कांदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच त्यांना नको म्हणून सांगितले.  

आश्वासने विसरला नाहीत, अशी आशा करतो
तुम्ही आश्वासने विसरले नाहीत अशी आशा करतो बिहारमधील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पूर्ण न झालेल्या अनेक आश्वासनांचा 
उल्लेख केला आहे. १ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र राजदने ट्वीटरवर पोस्ट केले आहे.
 

Web Title: Politics heats up: round of allegations; Modi says 'to fulfill aspirations for next decade'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.