राहुल गांधी अखिलेश यादवांना तब्बल ७ वर्षांनी भेटले; अखिलेश म्हणाले, आग्रा हे प्रेमाचे दुकान...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 08:37 AM2024-02-26T08:37:36+5:302024-02-26T08:38:22+5:30
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
आग्रा : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत आग्रा येथे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
राहुल गांधी म्हणाले की, भारतातील जनतेने, शेतकरी आणि मजुरांनी मला सांगितले की हिंसा आणि द्वेषाचे कारण अन्याय आहे. या देशात २४ तास गरिबांवर अन्याय होत आहे.
अखिलेश म्हणाले की, आग्रा हे प्रेमाचे दुकान म्हणून जगात ओळखले जाते. या शहरातून प्रेम घ्या आणि देशभरात द्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. अखिलेश आणि राहुल ७ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्याचा उत्तरप्रदेशला फायदा होईल.
चिनी मालामुळे आले 'गंभीर संकट'
• राहुल गांधींनी लॉक इंडस्ट्रीचे केंद्र असलेल्या अलीगढमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित केला आणि स्थानिक कारागिरांना येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला.
ते म्हणाले की, भारतीय बाजारपेठांमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंचा पूर आल्याने स्वदेशी लघु, कुटीर उद्योग आणि कारागीर यांच्यावर 'गंभीर परिणाम' झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रा एकता, बंधुता आणि समरसतेचा संदेश देते.
• ही यात्रा येणाऱ्या पिढ्यांना संदेश देईल की, एक सरकार देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्ही या यात्रेच्या माध्यमातून त्यांना रोखण्याचे काम केले होते.
आज शेतकरी सरकारच्या विरोधात उभा आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे घाबरले आहे. यावेळी शेतकऱ्यांना सन्मान दिला जाईल. पीडीएला (मागास, दलित, अल्पसंख्याक) जो सन्मान मिळायला हवा होता तो इतक्या वर्षानंतरही मिळाला नाही आणि जो मिळत होता तोही भाजपने लुटला आहे.
- अखिलेश यादव, सपा, अध्यक्ष
अन्याय काळात बेरोजगारी हे सर्वात मोठे संकट बनले आहे. अग्निवीर योजना आणून सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. लाखो सरकारी पदे रिकामी आहेत, पण वर्षानुवर्षे भरली जात नाहीत. पदे भरण्यास सुरुवात झाली की पेपर फुटतो. अन्यायाविरुद्ध एकत्र व्हा. न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत रहा.
- प्रियांका गांधी, सरचिटणीस काँग्रेस