गुना – मध्य प्रदेशातील गुना येथे मंगळवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शेतकरी कुटुंबाला लाठीकाठीने बेदम मारहाण केली. ज्यानंतर या शेतकरी दाम्पत्यांनी किटनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुनाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तात्काळ पदावरुन हटवून संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी व्हिडीओ जारी करत म्हटलं आहे की, गुनामधील या घटनेचा व्हिडीओ पाहून अत्यंत व्यथित झालो आहे, अशाप्रकारे दुर्दैवी घटना टाळल्या पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. भोपाळमधील तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन संपूर्ण तपास करेल. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
घडलेल्या प्रकारावरुन विरोधी पक्ष काँग्रेसने मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोडींत पकडलं आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विट केलं आहे की, हे शिवराज सरकार राज्याला कुठे घेऊन चालली आहे? हा कसला जंगलराज आहे? गुनामधील एका शेतकरी दाम्पत्याला मोठ्या संख्येने लाठीचार्ज करुन मारहाण करण्यात येत आहे.
तसेच जर पीडित युवकाच्या जमिनीसोबत कोणताही शासकीय वाद असेल तर कायद्यातंर्गत ते सोडवता येऊ शकतं. पण अशाप्रकारे कायदा हातात घेऊन त्याला, त्याच्या पत्नीला, नातेवाईक आणि चिमुकल्या मुलांनाही इतक्या बेदमपणे मारहाण करणे हा कोणता न्याय आहे? हे सर्व मागासवर्गीय कुटुंबातील गरीब शेतकरी आहेत म्हणून केलं का? असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही ट्विट करुन या घटनेचा निषेध केला आहे, त्यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोललो आहे, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुनाचे जिल्हाधिकारी एस विश्वनाथन आणि एसपी तरुण नायक यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. रात्री उशिरा राजेश कुमार सिंह यांना गुना येथील पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.