नवी दिल्ली - निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, देशात काँग्रेसशिवायदेखील विरोधीपक्ष शक्य आहे. तसेच, पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्यावी लागेल, असा सल्लाही पीके यांनी काँग्रेसला दिला आहे. याचबरोबर केवळ ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमाने तुम्ही भाजपला हरवू शकत नाही, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी ब्लू प्रिंटदेखील सादर केली. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, देशातील सर्वात जुन्या पक्षाशिवाय भाजपविरोधी आघाडी उभारणेही शक्य आहे.
प्रशांत किशोर म्हणाले, 1984 नंतर काँग्रेसला एकातरी लोकसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळाला? गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा ९० टक्के निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी. याच वेळी, मी जवळपास काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच होता, असेही पीके म्हणाले.
पीकेंनी केली पीएम मोदींची तारीफ -पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना प्रशांत किशोर म्हणाले की, ते सर्वांचे ऐकतात आणि हीच त्यांची ताकद आहे. लोकांना काय हवे आहे? हे त्यांना माहीत आहे. पुढील काही दशके देशाचे राजकारण भाजपभोवतीच फिरत राहणार आहे, असेही पीके म्हणाले.
प्रशांत किशोर सध्या ममता बॅनर्जींसाठी निवडणुकीची रणनीती तयार करत आहेत. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी, नंतर नितीश कुमार, राहुल गांधी, अखिलेश यादव, एम.के. स्टॅलिन, जगन मोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठीही निवडणूक रणनीती तयार केली आहे.