राजकारण बाजुला ठेवणार! हायकमांडचा विरोध झाला तरी थरुर मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:36 PM2023-04-19T12:36:44+5:302023-04-19T12:37:11+5:30
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी आज चक्क चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची स्तुती केली आहे.
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी आज चक्क चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची स्तुती केली आहे. केरळला वंदेभारत एक्स्प्रेसचे गिफ्ट देण्यात आले आहे. यावर विकास आणि राजकारण हे वेगवेगळे असले पाहिजे असे म्हणत थरुर यांनी आपणही या सोहळ्याला जाणार असल्याचे म्हटले आहे.
येत्या २५ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. ही ट्रेन कासरगोडपर्यंत धावणार आहे. २२ एप्रिलला या ट्रॅकवरील वंदे भारतची चाचणी पूर्ण होणार आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन सुरवातीला कन्नूरपर्यंतच चालविण्याची योजना होती. परंतू नंतर ही सेवा कासरगोडपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
केरळमध्येही वंदे भारत ट्रेन सुरु करावी अशी मागणी आपण ट्विटद्वारे केली होती, याची आठवण थरुर यांनी केली. केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू इच्छितो. मी १४ महिन्यांपूर्वी याबाबत बोललो होतो. अश्विनी वैष्णव यांनी तेच केले याचा मला आनंद आहे. 25 तारखेला थिरुवनंतपुरम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मी उपस्थित राहण्यास उत्सुक आहे. राजकारणाच्या पलीकडे प्रगती झाली पाहिजे, असे ट्विट थरुर यांनी केले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केरळला आता फक्त एकच वंदे भारत एक्स्प्रेस देण्यात येत आहे, भविष्यात राज्यात आणखी अनेक गाड्या सुरू केल्या जातील असे म्हटले आहे. रेल्वे केरळमध्ये दोन टप्प्यात ट्रॅक अपग्रेड करणार आहे, तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ट्रॅक अपग्रेडेशनच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, कासारगोड ते तिरुवनंतपुरमपर्यंतचा संपूर्ण ट्रॅक 110 किमी प्रतितास वेगासाठी बदलण्यात येईल. 381 कोटी रुपये खर्चून हे काम होणार असून दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे, असे वैष्णव म्हणाले.