चंदीगड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलांना घोषणा द्यायला लावल्यामुळे भाजपाच्या उमेदवार किरण खेर अडचणीत सापडल्या आहेत. किरण खेर यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठविली असून 24 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी अनिल गर्ग यांनी ही नोटीस पाठविली आहे.
किरण खेर यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये मुले घोषणा देत आहे. तसेच, नगरसेवक मदेश इंद्र सिद्धू मुलांसोबत आहेत. वोट फॉर किरण खेर, अबकी बार मोदी सरकार, अशी घोषणा या व्हिडीओत येत आहेत. तर, किरण खेर यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, वोट फॉर किरण खेर, अबकी बार मोदी सरकार.. मुले देवाची रूपे असतात.
याप्रकरणी निवडणूक आयोगाने किरण खेर यांना नोटीस पाठविली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड अॅक्टनुसार ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या अॅक्टनुसार अधिकारी किंवा राजकीय पक्ष कोणत्याही मुलाला निवडणुकीच्या कार्यक्रमात सामील करु शकत नाही. दरम्यान, याप्रकरणी किरण खेर यांनी माफी मागितल्याचे समजते.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला दिलसेंदिवस रंगत येत आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.