बंगळुरू- पवनपुत्र हनुमानाला रुद्राचा अवतार समजलं गेलंय. रावणाला धडा शिकवण्यासाठी हनुमानानं समुद्रही पार केला होता. परंतु त्याच भगवान हनुमानाची मूर्ती आचारसंहितेमुळे जवळपास अनेक तासांहून अधिक वेळ रस्त्याच्या मधोमधच पडून होती. त्यामुळे या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना होण्यासाठी 15 तासांचा अवधी लागला आहे. कर्नाटक पोलिसांनी आचारसंहितेमुळे या हनुमानाच्या भव्य मूर्तीला रस्त्याच्या मधोमध थांबवलं होतं. निवडणूक अधिका-यांच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर तोडगा निघाला आणि ती हनुमानाची मूर्ती मार्गस्थ झाली.
हनुमानाची 62 फूट लांब आणि 750 टन वजनाची मूर्ती बनवणारे श्रीराम चैतन्य वर्धिनी ट्रस्टचे मुनीराजू यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मूर्ती पूर्व बंगळुरूतून प्रतिष्ठापनेसाठी कोलारच्या कचाराकनाहल्लीकडे नेत होते. त्याच वेळी सोमवारी रात्री पोलिसांनी या मूर्तीला एनएच-48 महामार्गाजवळच आचारसंहितेचा हवाला देत कथित स्वरूपात थांबवून ठेवलं होतं.सूत्रांच्या माहितीनुसार श्रीराम चैतन्य वर्धिनी ट्रस्टचे मुनीराजू यांनी मूर्ती घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळवली होती. परंतुही तरीही पोलिसांनी आचारसंहितेच्या कारणास्तव हे वाहन अडवलं होतं. त्यानंतर ब-याच वेळानं निवडणूक आयोगाच्या मध्यस्थीनंतर मूर्तीला मंगळवारी दुपारी मार्गस्थ करण्यात आलं. 62 फुटांची ही मूर्ती हसन जिल्ह्यातल्या श्रवणबेळगोळमध्ये स्थापित असलेल्या गोमतेश्वरच्या मूर्तीहून भव्य आहे. जगातील ही सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा श्रीराम चैतन्य वर्धिनी ट्रस्टनं केला आहे.