पाटणा - बिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे. काही विद्यार्थी पायऱ्यांवर बसून उत्तरपत्रिका लिहीत आहेत तर काही जण महाविद्यालयाच्या बागेत एकमेकांशेजारी बसून उत्तरपत्रिका सोडवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या रामलखन महाविद्यालयात हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामलखन महाविद्यालयात पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसायला जागाच मिळाली नव्हती. त्यामुळे आपल्या परीक्षा केंद्रात, महाविद्यालयात विद्यार्थी पोहोचले तेव्हा त्यांना जिथे जागा मिळेल तिथे बसून उत्तरपत्रिका लिहा असे सांगण्यात आले होते. महाविद्यालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने हा सर्व गोंधळ झाल्याचं अधीक्षकांनी सांगितलं आहे.
रामलखन महाविद्यालयाची परीक्षा केंद्रासाठीची क्षमता ही अडीच हजार विद्यार्थी बसतील इतकीच आहे. पण येथे सहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे जिथे बसायला जागा मिळेल तिथूनच उत्तरपत्रिका लिहिण्याखेरीज विद्यार्थ्यांना पर्याय नव्हता असा खुलासा महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात देखील असाच एक अजब प्रकार समोर आला होता. पूर्वविद्यापीठ परीक्षेदरम्यान जवळपास 50 विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कार्डबॉक्स ठेऊन परीक्षा द्यावी लागली. हावेरी जिल्ह्यात ही घटना घडली होती.
हावेरी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी डीडीपीआयला या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं होतं. कॉपी रोखण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जातं. कॉलेजमध्ये परीक्षा देणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली होती. हे विद्यार्थी अर्थशास्त्र आणि रसायन विज्ञानाचा पेपर देत होते. तसेच या कार्डबॉक्सला मुलांना लिहिण्यासाठी दिसावं आणि श्वास घेता यावं एवढं कापण्यात आलं होतं. या कार्डबॉक्समुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूला बघता येणं शक्य नव्हतं. मात्र अशाप्रकारे विद्यार्थ्यांसोबत प्रकार घडल्याने राज्यात विरोधकांनी आवाज उठविला. मुलांसोबत केलं जाणारं कृत्य अयोग्य आहे याबाबत योग्य ती कारवाई करू असं आश्वासन शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिलं होतं.