नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेला 'पंजा'च्या वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. याबद्दल भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका केली होती. भाजपचे नेते आणि वकील असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह अवैध ठरवावं, यासाठी निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती. 'निवडणूक आचारसंहितेनुसार, शरीराचा कोणताही अवयव निवडणूक चिन्ह असू शकत नाही. यासोबतच निवडणूक चिन्ह घेऊन कोणीही मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही, असाही नियम आहे मात्र काँग्रेसचं निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्यानं या दोन्ही नियमांचं उल्लंघन होतं,' असं सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असलेल्या उपाध्याय यांनी सांगितलं. कर्नाटकमध्ये १२ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकमधील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. याठिकाणी काँग्रेससमोर भाजपचं कडवं आव्हान आहे. मात्र आता काँग्रेसचा 'पंजा'च संकटात सापडल्यानं पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाविरोधात उपाध्याय यांनी २९ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
काँग्रेसचा 'हात' राहणार की जाणार? १८ एप्रिलला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 3:36 PM