ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - देशातील ३ लोकसभा आणि ३३ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या शनिवारी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीत गुजरातच्या ९ विधानसभेच्या आणि एका लोकसभेच्या जागेचा समावेश असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर गुजरातमध्ये पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी ही पोटनिवडणूक महत्वाची ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदराच्या जागेचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी भाजपाने वडोदराच्या उपमहापौर रंजन बेन भट्ट यांना उमेदवारी दिली आहे. देशातील ३३ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उत्तरप्रदेशातील ११, राजस्थान ४, आसाम ३, गुजरात ९, पश्चिम बंगाल २, आणि त्रिपूरा , आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि सिक्कीम या राज्यातील प्रत्येक एका जागेचा समावेश आहे. उत्तरप्रदेशातील ११ जागासाठी सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि भाजपा सर्व जागा लढवित आहेत. उत्तरप्रदेशात ८० जागापैकी ७१ जागावर भाजपाने विजय मिळविला आहे. आंध्रप्रदेशातील मेडक, गुजरातमधील वडोदरा, उत्तरप्रदेशातील मैनपूरी या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होत असून या सर्व जागांसाठी १३ सप्टेंबर रोजी मतदान होत असून १६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, नुकत्याच बिहारमध्ये १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी, नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि काँग्रेस युतीला ६ जागा तर भाजपाला ४ जागा मिळाल्या होत्या.