नवी दिल्ली : सात राज्यांतील लोकसभेच्या ५९ मतदारसंघांत सहाव्या टप्प्यात आज, रविवारी मतदान होणार असून, त्यानंतर ५४२ पैकी ४८३ मतदारसंघांतील मतदान पूर्ण झालेले असेल. सातव्या टप्प्यात १९ मे रोजी ५९ ठिकाणचे मतदार हक्क बजावतील. पाचव्या टप्प्यानंतर प्रचाराची आणखी घसरलेली पातळी पाहता, भाजप व विरोधक यांच्यात अटीतटीची लढाई सुरू झाल्याचे जाणवत आहे.या टप्प्याच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही त्यांनी टीका केली. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे थेट नाव न घेता, ते लवकरच तुरुंगात दिसतील, असा दावा केला. योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांची तुलना औरंगजेबाशी केली तर राबडीदेवी यांनी पंतप्रधानांचा उल्लेख जल्लाद असा केला. राजस्थानातील बलात्काराचेही भाजपने राजकारण केले.
काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पातळी सोडून मोदींवर टीका केली. आपच्या दिल्लीतील उमेदवार आतिशी यांनी आपली वैयक्तिक बदनामी करणारी पत्रके गौतम गंभीर व भाजपने वाटल्याचा आरोप केला. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्याला राहुल गांधीच जबाबदार असतील, कारण त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांविरोधात प्रचार केला, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला, तर भाजप व काँग्रेस हे दोन्ही जातीयवादी पक्ष असल्याची टीका मायावती यांनी केली. मोदी हे अभ्यास न करणारे विद्यार्थी असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी केली. शीखविरोधी दंगलींबाबत सॅम पित्रोडा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस याच टप्प्यात अडचणीत आली.अशा प्रचाराचा काय परिणाम झाला आणि मतदार कशा पद्धतीने मतदान करणार, हे उद्या ठरेल. पहिल्या पाच टप्प्यांत सरासरी ६५ टक्के मतदान झाले, तर सहाव्या टप्प्यात ते ६२ टक्क्यांवर आले. यंदा उत्तर भारतात कमी मतदान झाले. उद्याही मतदान होणारे मतदारसंघ उत्तर भारतातील आहेत. त्यामुळे तेथील मतदान वाढणार की कमी होणार, हे महत्त्वाचे आहे. ज्या ५९ ठिकाणी उद्या मतदान होणार आहे, त्यापैकी ४६ जागा २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या.
या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर, तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.
निकालांना लागेल विलंबमुंबई : निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा सर्वांना असल्याने सर्वांचे लक्ष २३ मे कडे लागले आहे. मात्र, व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला २ ते ३ तास विलंब होण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या पडताळणीत थोडा वेळ जाण्याची शक्यता असून, निकाल जाहीर होण्यासदेखील विलंब होऊ शकेल, असे राज्याचे अप्पर मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.