सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी उद्या, गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली असून नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावत आहेत.
-हिमाचल प्रदेश निवडणूक- दुपारी 2 पर्यंत 54 टक्के मतदान
- हिमाचल प्रदेश निवडणूक- दुपारी 12 वाजेपर्यंत झालं 28.6 टक्के मतदान.
- हिमाचल प्रदेश मतदान- पहिल्या दोन तासात झालं 13.72 टक्के मतदान.
सर्व ६८ मतदारसंघांत पारंपरिक भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत आहे. ६२ विद्यमान आमदारांसह एकूण ३३७ उमेदवार मतदारांचा कौल मागत आहेत.मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, दहा मंत्री, आठ संसदीय सचिव, उप सभापती जगत सिंह नेगी, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आणि डझनच्यावर माजी मंत्र्यांचे भवितव्य मतदार ठरवतील. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा सर्व ६८ जागा लढवत असून बहुजन समाज पक्ष ४२, मार्क्सवादी पक्ष १४, स्वाभिमान पक्ष आणि लोकगठबंधन पक्ष प्रत्येकी सहा तर भाकप तीन जागा लढवत आहेत.तिथे प्रचारमोहीम १२ दिवस चालली. भाजपा आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी एकूण ४५० सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी अनुक्रमे सात आणि सहा सभा घेतल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन सभा घेतल्या.भाजपाने प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरून मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना लक्ष्य केले, तर काँग्रेसने नोटाबंदी व जीएसटीवरून भाजपावर टीका केली होती.भाजपाने चार काँग्रेसजनांना उमेदवारी दिली असून, त्यात माजी मंत्री अनिल शर्मा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि मुख्यमंत्रीपद भूषवलेले प्रेम कुमार धुमल यांनी आपापले मतदारसंघ बदलले असून, ते आता अनुक्रमे अर्की आणि सूजनपूर मतदारसंघात उभे आहेत. भाजपाने सहा तर काँग्रेसने तीन महिलांना उमेदवारी दिली असून, एकूण १९ महिला मतदारांचा कौल मागत आहेत. काँग्रेस व भाजपाकडून प्रत्येकी सात बंडखोरही उभे आहेत.