धौलपूर : मतदान काँग्रेसला केले. पण, मत मात्र भाजपला पडत आहे. राजस्थानातील धौलपूर विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रावर मतदारानेच रविवारी हा आक्षेप घेतला आहे. त्यानंतर १८ एव्हीएम सील करून नव्याने मशिन ठेवण्यात आल्या. या मतदान यंत्रांवर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या अनेक मतदारांनी अशी तक्रार केली आहे की, ते मतदान एका पक्षाला करत आहेत. पण, त्यांना मिळणारी चिठ्ठी दुसऱ्याच पक्षाची आहे. या मतदारसंघात वोटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रायल (व्हीव्हीपीएटी) सुरु आहे. त्यानुसार मतदाराला मतदानानंतर ही चिठ्ठी मिळते. राकेश जैन या मतदाराने याबाबत तक्रार केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपण काँग्रेसला मतदान केले. पण, मतदानाची चिठ्ठी भाजपची मिळाली आहे. येथील अधिकाऱ्याने याची तपासणी केली असता यात तथ्य असल्याचे आढळून आले. या मशिनवर चुकीची नोंद होत असल्याचे दिसून आले. मतदान केंद्रावरील अधिकारी मनीष फौजदार यांनी सांगितले की, या ठिकाणचे मतदान दोन तासांसाठी थांबविले होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर घोषणाबाजी केली. अनेक मतदान केंद्रांवर मशिन सुरू झाल्या नाहीत१२ पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर वोटिंग मशिन सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मतदारांना मोठा मनस्ताप झाला. एक तासानंतर या मशिन सुरु झाल्या त्यानंतर मतदान पुन्हा सुरु झाले. धौलपूर विधानसभा मतदारसंघात रविवारी सकाळी ७ पासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या मतदारसंघात २३१ मतदान केंद्रे होती. यापैकी ६७ संवेदनशील आहेत. काँग्रेसचे उमेदवार बनवारीलाल शर्मा म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांकडून मला ही माहिती मिळाली की, अनेक मशिन वेळेवर सुरु झाल्या नाहीत. मशिनवर एका पक्षाला मतदान केल्यास ते दुसऱ्याच पक्षाला मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.
मतदान काँग्रेसला, पण खुलतेय कमळ
By admin | Published: April 10, 2017 12:54 AM