अहमदाबाद - विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 93 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, राज्यात दीर्घकाळानंतर सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कसलेली कंबर आणि पटेलांची नाराजी इव्हीएम मशीनमधून व्यक्त होण्यासाठी हार्दिक पटेल यांनी लावलेला जोर यामुळे गुजरात विधानसभेचा प्रचार बऱाचा गाजला. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरीस मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपाच्या हातात आयते कोलित मिळाले होते. त्यानंतर संपूर्ण प्रचारच विकाच्या मुद्द्यावरून हटून वैयक्तिक टीकाटिप्पणी, पाकिस्तान, जातीचे राजकारण आणि भावनिक पातळीवर पोहोचला होता. आता हा प्रचार पाहून गुजराती मतदार दुसऱ्या टप्प्यात कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि गुजरातमध्ये कुणाचे सरकार बनवतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
गुजरातमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 14 डिसेंबरला होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 6:34 PM