ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १६- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज होत असून, तामिळनाडू, केरळ आणि पुडूच्चेरीमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, एम करुणानिधी आणि व्ही.एस.अच्युतानंदन हे प्रमुख नेते निवडणूक रिंगणात आहेत.
तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे. तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये पक्षविस्ताराच्या दृष्टीने भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला आहेत. ५.८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार आहे. तामिळनाडूत एकूण ६५,६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष आहेत. १९६७ पासून या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत राहिली आहे. केरळमध्ये सत्ताधारी यूडीएफ आणि एलडीएफमध्ये मुख्य लढत आहे. केरळमध्ये भाजपला राजकीय अस्तित्व निर्माण करायचे असल्याने त्यांनी इथे पूर्ण ताकत लावली आहे. केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी १२०३ उमेदवार रिंगणात आहेत. यात १०९ महिला आहेत.
पुडूच्चेरीमध्ये दोन काँग्रेसपक्षांमध्येच लढत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एन.रंगासॅमी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. पुडूच्चेरीमध्ये तीस जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. यात २१ महिला आहेत.