- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी संपली. पंजाबच्या ११७ आणि गोव्याच्या ४0 जागांसाठी शनिवार, ४ फेब्रुवारीला मतदान आहे. निकाल ११ मार्च रोजी जाहीर होणार आहे.पंजाब निवडणुकीच्या प्रचारात मुख्यत्वे अमलीपदार्थाच्या व्यसनांनी गावोगावी घातलेले थैमान आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे दोन विषय ऐरणीवर राहिले. सत्ताधारी शिरोमणी अकाली दल भाजपा आघाडीला यंदा काँग्रेस व आम आदमी पक्षाशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित केले आहे. गोव्यामध्ये चुरस गोव्यातील ४0 जागांसाठीही तिरंगी लढत आहे. सत्ताधारी भाजपाला काँग्रेसखेरीज आपने आव्हान दिले आहे. आपने एल्विस गोम्स यांची मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी घोषित केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राज्य प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, शिवसेना व गोवा सुरक्षा मंच अशा तीन पक्षांची आघाडी तयार केली असून, माजी बांधकाम मंत्री व मगोपचे नेते सुदिन ढवळीकर हे या आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. भाजपाचे विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर हे निवडणुकीच्या रिंगणात असले तरी भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित केलेला नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवून भाजपा या निवडणुकीला सामोरी जात आहे.
पंजाब-गोव्यात उद्या मतदान
By admin | Published: February 03, 2017 5:11 AM