पणजी, दि. 23 - गोव्यात पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी अनुक्रमे सुमारे ७० आणि ८९.0८ टक्के मतदान झाले. गेल्या फेब्रुवारीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत पणजीत ७७ तर वाळपईत ८६.२९ टक्के मतदान झाले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ घटना वगळता कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झालेली नाही. मतदान शांततेत पार पडले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपीएटी यंत्रे मतदान प्रक्रियेसाठी वापरली.
दोन्ही ठिकाणच्या चुरशीच्या निवडणुकीत माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे या दिग्गजांसह सात उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले. मतमोजणी सोमवार, दि. २८ रोजी होणार आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप विरुध्द काँग्रेस अशीच थेट लढत आहे. या निवडणुकीत पर्रीकर आणि विश्वजीत यांच्या भवितव्यावर राज्यात भाजप सरकारचे भविष्य ठरणार आहे. पणजीत काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर तर अपक्ष केनेथ सिल्वेरा हे पर्रीकर यांच्याशी लढत देत आहेत. तर वाळपईत काँग्रेसतर्फे रॉय रवी नाईक आणि अपक्ष रोहिदास सदा गावकर निवडणूक लढवित आहेत.
मनोहर पर्रीकर यांनी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील मध्यवर्ती सरकारी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर केले. त्यानंतर ते नेहमीच्या हॉटेलमध्ये चहा-नाष्ट्यासाठी आले. त्यांचे हे आवडते हॉटेल असून मागीलवेळीही ते या हॉटेलमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे गेले होते.गोवा सुरक्षा मंचचे मार्गदर्शक तथा माजी संघप्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या निवडणुकीत त्यांचा उमेदवार आनंद शिरोडकर हे पर्रीकर यांचा पराभव करून निवडून येतील, असा दावा केला आहे. केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांनी या प्रतिनिधीशी पर्रीकर हे या वेळी विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा केला आहे.
मुख्यमंत्री रांगेत...
पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदान झाले. माजी संरक्षण मंत्री राहिलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर भाजपातर्फे रिंगणात आहेत. मतदानासाठी ते सामान्यांप्रमाणे रांगेत उभे होते. मतदानानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत चहापान केले.