नवी दिल्ली : कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती मते पडली (व्होटिंग पॅटर्न) याबाबत गुप्तता राखणारी नवी यंत्रणा आणण्यासाठी निवडणूक नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने सरकारकडे ठेवला आहे.सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील(इव्हीएम) मते मतदानकेंद्र निहाय मोजली जात असल्यामुळे विविध वस्त्या आणि पट्ट्यात किती मतदान झाले ते प्रत्येकाला कळून चुकते. एखादा लोकप्रतिनिधी संबंधित वस्तीतून मते न मिळाल्यामुळे त्या भागाशी भेदभाव करू शकतो. या सर्वांची परिणती तेथील मतदारांमध्ये दहशत निर्माण करणे किंवा तेथील लोकांना बळी ठरविण्यातही होऊ शकते, असा सूर व्यक्त झाला आहे. यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन मशीन निर्मात्या कंपन्यांनी ‘टोटलायझर’ ही नवी यंत्रणा विकसित केली आहे. प्रत्येक मशीनमधील मते उघड न करता १४ ईव्हीएमचा गट तयार करून गठ्ठा मते जाहीर करण्याची पद्धत अवलंबली जाऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)नवी यंत्रणा आणून जवळपास दशक होत आहे, मात्र अद्यापही प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी आणि कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत निवडणूक घेण्यासंबंधी नियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती आयोगाने सरकारला केली आहे.टोटलायझर यंत्रणेचा वापर केल्यामुळे मतांबाबत गोपनीयता राखण्यासह मतमोजणीच्यावेळी सर्व मते मिसळण्याची प्रक्रिया पार पाडता येते. निवडणूक मंडळात कायदा मंत्रालयाकडे प्रशासकीय जबाबदारी असते.विधि आयोगाकडूनही समर्थन...गेल्यावर्षी मार्चमध्ये विधी आयोगानेही निवडणूक सुधारणांसंबंधी अहवाल सादर करताना नव्या मशीनच्या वापराचे समर्थन केले होते. निवडणूक नियमांत सुधारणा केल्यास निवडणूक आयोगाला टोटलायझरचा वापर करीत मते मिसळणे शक्य होणार आहे. एखाद्या मतदारसंघातील विशिष्ट वस्ती किंवा भागाशी भेदभाव करण्याचे प्रकार टाळता येतील, अशी शिफारस या आयोगाने अहवालात केली आहे.
मतदान गुप्ततेसाठी नवी यंत्रणा आणणार
By admin | Published: January 22, 2016 2:52 AM