नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदानाच्या वेळी प्रत्येक राज्यात ईव्हीएमविषयीच्या तक्रारी आल्या, तर केरळात व्हीव्हीपॅटमधून साप निघाल्याने कर्मचारी व मतदारांची धावपळ झाली. केरळातच मतदानाच्या रांगेत चौघांचा मृत्यू झाला आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मारामारी झाली. त्यात गावठी बॉम्ब फेकण्यात आला आणि हाणामारीत एका मतदाराचा मृत्यू झाला. पण अशा स्थितीतही ११७ मतदारसंघांतील तब्बल ६६ टक्के लोकांनी मतदान केले.आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत मिळून लोकसभेच्या निम्म्याहून अधिक म्हणजे ३0३ मतदारसंघांत मतदान पूर्ण झाले आहे. यापुढील चार टप्प्यांत २४0 मतदारसंघांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील उरलेल्या १८ मतदारसंघांमध्येही २९ एप्रिल रोजी मतदान होईल. राज्यातील ३0 मतदारसंघांत दोन टप्प्यांत मतदान पूर्ण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष अमित शहा, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह व अखिलेश यादव, शरद यादव, मुख्तार अब्बास नकवी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर आदींनी मतदान केले.अमित शहा, मुलायम सिंह, मेहबुबा मुफ्ती, थरुर आदींचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. नवीन पटनायक, पी. विजयन, विजय रूपाणी आदी मुख्यमंत्र्यांनीही आज मतदान केले. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या पाच राज्यांतील सर्व मतदानसंघांतील मतदान आता पूर्ण झाले आहे.गोवा, पश्चिम बंगाल, आसाम व त्रिपुरा या चार राज्यांत ८0 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कमी मतदान झाले. कडक उन्हाचाही परिणाम काही राज्यांत झाला. मतदानाच्या वेळी मंगळुरूमध्ये जोरदार पाऊ स सुरू झाल्याने मतदारांची एकच तारांबळ उडाली. पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यांत मतदान यंत्रांविषयी असंख्य तक्रारी आल्या. जवळपास सर्वच राज्यांमध्ये मतदान यंत्रे नीट काम करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी ती बदलावी लागली. परिणामी मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अर्थातच मतदान यंत्रे बिघडल्याचा इन्कार केला. समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस यांनीच नव्हे, तर काही ठिकाणी भाजपतर्फेही काही ठिकाणी यंत्रांविषयी तक्रारी करण्यात आल्या.
देशातील ३0३ मतदारसंघांमध्ये पूर्ण झाले मतदान; ईव्हीएमविषयी सर्वत्र तक्रारी, बंगालमध्ये हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 6:26 AM