नवी दिल्ली- गेल्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीमध्ये असणाऱ्या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. दिल्ली आणि परिसरामध्ये सकाळपासूनच धुरके तयार झाल्यामुळे दृश्यताही कमी झाली आहे. प्रदुषणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित केले होते मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवाल आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भेटण्यासाठी चंदिगढला जाऊन पोहोचले आहेत.
दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पीक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आर्द्रता आणि धूर एकत्रित होऊन धुरके तयार होत असल्याचे दिसून येते. गेल्या सोमवारपासून दिल्लीच्या हवेच्या गुणवत्ता अत्यंत खालावल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे गॅस चेंबर झाले आहे असे विधान केले होते.