Delhi-NCR Air Pollution: राजधानी दिल्लीतील वाढतं वायू प्रदूषण अतिशय गंभीर होत चाललं आहे. दिवसेंदिवस दिल्लीची हवा विषारी होत चालली आहे. दिल्लीतील वातावरणातील प्रदूषण आता इतकं वाढलंय की सरकार लवकरच कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिल्ली सरकारनं तसं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
"स्थानिक वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कडक लॉकडाऊनचं पाऊल उचलण्याची सरकारची तयारी आहे", असं सरकारच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं आहे.
दिल्ली आणि एनसीआर भागातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात दाखल असेलल्या याचिकेच्या सुनावणीत सरकारनं महत्त्वाची माहिती कोर्टाला दिली. दिल्ली सरकार कडक लॉकडाऊन सारखं कठोर पाऊल उचलण्यास तयार आहे. पण फक्त दिल्लीत नव्हे, तर एनसीआर भागातही त्याचवेळी लॉकडाऊन करण्याची गरज आहे, असं मत दिल्ली सरकारनं कोर्टात मांडलं आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे हवेच्या गुणवत्तेत फारसा फरक पडेल असंही नाही. वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर व्यापक स्तरावर तोडगा काढण्याची गरज असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.