नवी दिल्ली : धुळीच्या वादळामुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात खूपच वाढ झाली असून शुक्रवारी चौथ्या दिवशीही त्याची पातळी कमी झाली नाही. वेगवान वाऱ्यांमुळे हे वायूप्रदुषण आपोआप कमी होईल असे सांगण्यात आले. या प्रदुषणामुळे दिल्ली व राजधानी क्षेत्रात सर्व बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे.राजधानीत वायूप्रदुषणाचे प्रमाण पीएम१० एककानूसार ७५४ व दिल्ली शहरामध्ये ते ८०१ इतके नोंदले गेले आहे. सर्वात धोकादायक पातळीपेक्षा कितीतरी पट अधिक प्रमाणात दिल्लीमध्ये वायूप्रदुषण वाढले असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळामुळे दिल्लीमध्ये वायूप्रदुषण खूप वाढले आहे. या नैैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सज्ज राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक दोन दिवसांत वायूप्रदुषण कमी होईल असा अंदाज आहे.सफर या संस्थेतील हवामानतज्ज्ञ गुरफान बेग म्हणाले की, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे येत्या एक-दोन दिवसांत ताशी २५ ते ३५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेले वायूप्रदुषण कमी होईल. धुसर वातावरणामुळे दिल्लीतील सर्व बांधकामे रविवारपर्यंत थांबविण्याचा आदेश नायब राज्यपाल अनिल बैैजल यांनी गुरुवारी दिला होता.वाहतुकीवर परिणामपंजाब व हरयाणामध्ये तिसºया दिवशीही वातावरणात धुळीचे आच्छादन पसरलेले होते. त्यामुळे चंदीगढमध्ये हवाई वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. धूसर वातावरणामुळे चंदीगढहून ३० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. हरयाणा व पंजाबमध्ये शनिवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. वायूप्रदुषणाची पातळी अनेक पटीने वाढल्याने श्वसनविकारांचा त्रास होण्याची शक्यताही वाढते. त्यादृष्टीने लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे हरयाणा सरकारने म्हटले आहे.
दिल्लीला प्रदुषणाचा विळखा अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:52 AM