पूजा खेडकर आमच्यामुळे नाही, तिच्यामुळेच एवढी प्रसिद्ध झाली; वकिलाला युपीएससीचे कोर्टात जोरदार उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:54 PM2024-09-26T13:54:16+5:302024-09-26T13:55:20+5:30
Pooja Khedkar News: आज हायकोर्टाने खेडकरच्या अटकेच्या संरक्षणाला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस पूजा खेडकरला अटक करू शकणार नाहीत.
बरखास्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आज हायकोर्टाने खेडकरच्या अटकेच्या संरक्षणाला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस पूजा खेडकरला अटक करू शकणार नाहीत.
आज झालेल्या सुनावणीत पूजा खेडकरच्या वकिलांनी खोटी साक्ष नोंदविल्याच्या अर्ज प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. पूजा खेडकर ही महाराष्ट्रातच राहत असल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले. सध्या हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये आहे. सगळ्या प्रसारमाध्यमांचे लक्ष तिच्यावर आहे. यामुळे ती प्रचंड दबावाखाली असल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे.
यावर दिल्ली पोलिसांच्या वकिलाने युक्तीवाद करताना तपास संस्थांवर कधी दबाव नसतो, असे म्हटले. तर युपीएससीच्या वकिलांनी पूजा खेडकर ही तिच्यामुळेच एवढ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असेल तर त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद घ्यायला नको होती, असे म्हटले आहे.
पूजा खेडकरविरोधात पोलिसांचे म्हणणे काय...
२०२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेत खेडकरने वेगवेगळे अपंगत्व प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र अहमदनगर, महाराष्ट्राच्या वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केले होते. यामुळे दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती, तसेच भविष्यातील कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. दोषी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यूपीएससीच्या या निर्णयाविरोधात पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यूपीएससीला तिच्या नावामध्ये कोणताही फेरफार किंवा चुकीची माहिती दिली नसल्याचा दावा तिने केला होता.