जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक पुंछमधील सिंधरा परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी हे परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला सोमवारी संध्याकाळी मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम चालवली. रात्री ११.३० च्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. त्यानंतर संपूर्ण रात्रभर दहशतवाद्यांना घेरून पहारा ठेवण्यात आला.
त्यानंतर आज सकाळी दहशतवादी आणि लष्करामध्ये पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला. त्यादरम्यान लष्कराने ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांची अध्याप ओळख पटू शकलेली नाही. मात्र सर्व दहशतवादी हे परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी जून महिन्यात झालेल्या एका चकमकीमध्येही लष्कराने ५ दहशतवाद्यांना ठार केले होते. तेसुद्ध सर्व परदेशी दहशतवादी होते.
सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची संख्या ५० च्या आसपास आहे. त्याशिवाय काश्मीर खोऱ्यात सध्या २० ते २४ परदेशी दहशतवादी आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या माहितीनुसार खोऱ्यातील ३०-३५ दहशतवादी स्थानिक आहेत. तर इतर दहशतवादी हे परदेशी आहेत. गेल्या महिन्यामध्ये डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, आम्ही दहशतवाद्यांच्या इको सिस्टिमला घेरलेलं आहे.