पुंछ : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. लष्कराच्या ट्रकला उडवण्यासाठी दहशतवाद्यांनी स्टिकी बॉम्बचा वापर केला होता. यासंबंधीचे पुरावे मिळाले आहेत. लष्कराच्या ट्रकवर बॉम्ब हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी जवळपास 36 राऊंड गोळीबार केला. हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासासाठी शोधमोहीम वेगाने सुरू आहे. तसेच, पूंछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एकूण 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, स्निफर डॉग आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. जवळपास 9 तास नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (NSG) टीमने दहशतवादी हल्ल्याचा तपास केला. यासोबतच या संपूर्ण घटनेची प्रत्येक लिंक शोधली जात आहे. या हल्ल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, सर्व परिस्थितीवर चर्चा झाली असून यावर आमची भूमिका काय असेल यावरही चर्चा झाली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये गुरुवारी (20 एप्रिल) लष्कराच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 5 जवान शहीद झाले. या घटनेनंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, हा भ्याड हल्ला झाला, त्यावेळी हे लष्करी जवान पूंछमधील एका गावात आयोजित इफ्तार पार्टीसाठी ट्रकमधून फळे आणि इतर वस्तू घेऊन जात होते. या इफ्तार पार्टीत उपवास करणाऱ्यांसोबत त्या गावचे पंच, सरपंच यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
या हल्ल्यात हवालदार मनदीप सिंग, हरकिशन सिंग, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई सेवक सिंग आणि लान्स नाईक देबाशिष बसवाल हे पाच जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दल संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. दुसरीकडे, या हल्ल्याची जबाबदारी पीएएफएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी पीएएफएफ संबंधित आहे.