Poonch Terrorist Attack : शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला, ज्यात चार जवान जखमी झाले आणि एक जवान शहीद झाला. शहीद जवानाचे नाव विकी पहाडे असून, ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी होते. या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना हेलिकॉप्टरमधून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री उशिरा उपचारादरम्यान विकी पहाडे यांनी अखेरचा श्वास घेतला.
या हल्ल्यात विकी पहाडे गंभीर जखमी झाले होते. जवान विकी पहाडे हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई (दुलारी पहाडे), पत्नी (रीना पहाडे), मुलगा हार्दिक आणि तीन बहिणी असा परिवार आहे, तर वडील दिमक पहाडे यांचे निधन झाले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी संरक्षण दलाच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर चार जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या फेरीत २५ मे रोजी अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मतदान होणार आहे. पूंछ हा त्याच मतदारसंघाचा भाग आहे.
संरक्षण दलाची दोन वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशिधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे वृत्त कळताच राष्ट्रीय रायफल युनिटच्या जवानांनी शशिधर भागाला वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या जवानांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पूंछ शहरामध्ये व परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच निमलष्करी जवानांनी शुक्रवारपासून त्या शहरात काही ठिकाणी धाडी घातल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.