ऑनलाईन लोकमत
चेन्नई, दि. ५ - मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलेल्या चेन्नईमध्ये पाणी ओसरु लागल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र काही भागांमध्ये अजूनही पाणी कायम असल्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. बस, ट्रेन, दूरसंचार सेवा काही प्रमाणात सुरु झाली आहे.
प्रलयकारी पूरामध्ये चेन्नईतील रस्ते, रेल्वेमार्गाचे नुकसान झाले आहे. चेन्नईच्या काही भागांमधून पाणी अद्यापही ओसरले नसल्यामुळे नागरीक इमारतींच्या सर्वात वरच्या मजल्यावर आश्रयाला आहेत. दूध, पाणी मिळणेही मुश्किल झाल्याने त्यांचे हाल होत आहेत. शहरातील एटीएम आणि पेट्रोल पंपाबाहेर नागरीकांच्या रांगा लागल्या आहे. उद्या रविवार असूनही बँका सुरु रहाणार आहेत.
चेन्नई विमानतळावरुन व्यावसायिक उड्डाणे सुरु व्हायला अजून दोन दिवस लागतील. विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतर आणि पाणी ओसरल्यानंतर प्रवासी विमान वाहतूक सुरु होईल असे केंद्रीय हवाई उड्डयाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले.