नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमध्ये देशातील अनेक नागरिकांना भरमसाठ विजेचं बिल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांनी त्याबाबत तक्रारीदेखील दाखल केल्या आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यामध्ये वीज विभागाचा अनोखा कारनामा पाहायला मिळाला आहे. छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाला तब्बल 82 हजार 258 रुपये बिल आलं आहे. यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात देखील सात हजार रुपये बिल आलं होतं,
झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाने जवळपास एक वर्षाआधीच मीटर बदलण्याची मागणी केली होती. पण ते काही झालं नाही. आता आलेलं विजेचं बिल पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अजमेरच्या वीज विभागाने भीलवाडा जिल्ह्यातील गांगलास गावातील लाला रेगरच्या नावाने हजारो रुपयांचं बिल पाठवलं आहे. हे भलं मोठं बिल पाहून ग्रामस्थ देखील हैराण झाले आहेत. खरं तर झोपडीमध्ये एवढ्या विजेचा वापर होत नसताना देखील आलेलं बिल पाहून सर्वच लोकांना प्रश्न पडला आहे. गरीब कुटुंबाला आलेलं विजेचं बिल हा अनेक गावांत आता चर्तेचा विषय झाला आहे.
तब्बल 82 रुपये बिल आल्याने मोठा धक्का
लाला रेगर यांचा मुलगा रतन रेगर हा आता आपल्याला आलेलं हजारो रुपयांचं बिल कमी करण्यासाठी वीज विभागाच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहे. रतन रेगर याने दिलेल्या माहितीनुसार, मीटर खराब झालं आहे. गेल्या वर्षी देखील जास्त बिल आल्याने मीटर बदलण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी 900 रुपये देखील भरले होते. पण अद्याप कोणी मीटर बदलायला आलेलं नाही. यावेळी तर तब्बल 82 हजार रुपये बिल आल्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.