Asaduddin Owaisi On Nuh Violence: एमआयएम (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हरियाणातील नूह येथील हिंसाचाराच्या आरोपींवर खट्टर सरकारने केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे भलतेच संतापले. ओवेसी यांनी ट्विट करून कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ओवेसी म्हणाले की, हरियाणात गरिबांना बेघर केले जात आहे. गरीब मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. यावेळी ओवेसी यांनी कायदेशीर प्रक्रियेचाही उल्लेख केला. केवळ आरोपांच्या आधारे कारवाई केली जात असल्याचे ओवेसी म्हणाले. तसेच, एकतर्फी कारवाई केली जात आहे. खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
ओवेसी यांनी ट्विट केले की, 'सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणतीही बुलडोझर कारवाई करण्यापूर्वी सरकारला कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. इमारत मालकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही कारवाई करता येत नाही. केवळ आरोपांच्या आधारे शेकडो गरीब कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे. संघ विचारसरणीचे नेतेमंडळी जरी आपल्या तोडफोडीच्या राजकारणाचा अभिमान बाळगत असले तरी ते कायद्याने योग्य नाही आणि मानवतेच्या दृष्टीने इतरांवर अन्याय करणारेही आहे."
"हरियाणात गरीब मुस्लिमांनाच लक्ष्य करून एकतर्फी कारवाई केली जात आहे. खरे गुन्हेगार बंदुका घेऊन मोकाट फिरत आहेत. खट्टर सरकारने देखील गुन्हेगारांपुढे गुडघे टेकले आहेत. मातीची घरे आणि झोपडपट्ट्या पाडून स्वतःला मजबूत समजणे ही मोठी गोष्ट आहे का?" असा रोखठोक सवाल ओवेसींना केला.
प्रशासनाचा युक्तिवाद
प्रशासन केवळ मुस्लिमांची घरे पाडत आहे, तर इतर आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप असदुद्दीन ओवेसींनी केला. त्यावर हरियाणाच्या प्रशासनाचा दावा आहे की जी घरे आणि दुकाने पाडण्यात आली, ती सर्व घरे आणि दुकाने आरोपींच्या नावावर आहेत, असे नाही.
नूह हिंसाचार सुनियोजित होता?
सूत्रांच्या हवाल्याने, नासिर आणि जुनैद यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नूह हिंसाचाराची योजना तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. हा प्रश्न निर्माण होत आहे कारण हिंसाचारातील 8 आरोपींना राजस्थानच्या त्या भागातून अटक करण्यात आली आहे जिथे नसीर आणि जुनैदचे संबंध होते आणि हे सर्व क्षेत्र नूहपासून फक्त 50 किमीच्या परिघात येतात.