नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि दर्शन तुगुदीपा आज भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होऊ शकतात. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कलाकार कर्नाटकातील बंगळुरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये दुपारी 1:30 आणि 2:30 वाजता पार्टीत सामील होतील.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, रिपोर्टनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत किच्चा सुदीपचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
किच्चा सुदीप हा केवळ दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय अभिनेता आहे. 'फुंक' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच, तो अभिनेता सलमान खानच्या दबंग 2 चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी किच्चा सुदीप टीव्हीच्या जगात प्रसिद्ध होता. 'प्रेमदा कादंबरी' या मालिकेतून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली.
अभिनेताच नव्हे क्रिकेटपटू देखील!किच्चा सुदीप एका व्यावसायिक कुटुंबातून पुढे आला आहे. किच्चा सुदीप वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. किच्चा सुदीपने दयानंद सागर अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तो उत्कृष्ट क्रिकेटही खेळतो. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तो विद्यापीठ स्तरावरील क्रिकेटपटू देखील राहिला आहे.
सलग तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार2001 मध्ये किच्चा सुदीप याने सुपर हिट चित्रपट 'हुचा' मध्ये काम केले. या चित्रपटाने त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. किच्चा सुदीपला सलग तीन वर्षे 'हुचा', 'नंदी' आणि 'स्वाती मुथ्यम' या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. किच्चा सुदीपचे लग्न प्रिया राधाकृष्ण हिच्या बरोबर झाले आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीरकर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 20 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू होईल. 21 ते 23 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे. 24 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. सध्या कर्नाटकात भाजपचे सरकार असून ते सत्तेत राहण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाने यावेळी राज्यात पूर्ण बहुमत मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.