जयपूर : अन्न व नागरी पुरवठा विभागाची सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान पॉर्न क्लिप सुरु झाल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सचिवालयातील एनआयसी रुममध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव मुग्धा सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु असताना मध्येच स्क्रिनवर अश्लील क्लिप सुरु झाली. त्यानंतर तातडीने एनआयसीच्या संचालकांना बोलविण्यात आले आणि याप्रकरणी चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याचे, मुग्धा सिंग यांनी सांगितले.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि एनआयसीचे प्रतिनिधी असे जवळपास दहा जण या बैठकीत उपस्थित होते. तसेच, या बैठकीत राज्यातील 33 जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग होता. ही बैठक विविध योजना आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केली होती.
दरम्यान, याप्रकरणी एनआयसी संचालकांच्या अहवालानंतर दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे मुग्धा सिंग यांनी म्हटले आहे.